पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान मूल्यमापन चाचणीत सुमारे सात लाख परीक्षार्थी सहभागी
schedule25 Oct 26 person by visibility 228 categoryराज्य
उत्तीर्ण नवसाक्षरांना प्रमाणपत्रासह पुढील शिक्षणाची संधी
मुंबई : केंद्र पुरस्कृत ‘उल्लास नव भारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत राज्यभरात पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान मूल्यमापन चाचणी (एफएलएनएटी) यशस्वीरीत्या घेण्यात आली. या परीक्षेत सुमारे सात लाख परीक्षार्थी सहभागी झाले असून, उत्तीर्ण होणाऱ्या नवसाक्षरांना केंद्र शासनाच्या शालेय शिक्षण व साक्षरता विभागाकडून प्रमाणपत्र आणि गुणपत्रक देण्यात येणार आहे. तसेच त्यांना पुढील शिक्षणासाठी इयत्ता तिसरी, पाचवी, आठवी, दहावी आणि बारावीच्या परीक्षांना बसता येणार असल्याची माहिती शिक्षण संचालक (योजना) कृष्णकुमार पाटील यांनी दिली आहे.
असाक्षर व्यक्तींना साक्षर करण्यासाठी केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार हा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. उल्लास ॲपवर नोंदणी झालेल्या परीक्षार्थ्यांसाठी राज्यातील सर्व जिल्ह्यांतील यू-डायस प्राप्त शाळांमध्ये मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू, गुजराती, कन्नड, तेलुगू, तमिळ आणि बंगाली अशा नऊ माध्यमांतून ही परीक्षा घेण्यात आली.
या चाचणीमुळे आर्थिक व कायदेविषयक साक्षरता, डिजिटल साक्षरता, आपत्ती व्यवस्थापन कौशल्य, आरोग्यविषयक जागरूकता, बालसंगोपन, शिक्षण आणि कुटुंबकल्याणाशी संबंधित जीवनकौशल्ये विकसित होण्यास मदत होणार आहे.
शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, प्रधान सचिव रणजीत सिंह देओल आणि आयुक्त सचिंद्रप्रताप सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली असाक्षरांना साक्षर बनविण्यासाठी राज्यात ‘उल्लास-नव भारत साक्षरता कार्यक्रम’ राबविण्यात येत आहे. या नवसाक्षरांच्या आज झालेल्या परीक्षेदरम्यान जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासह केंद्र व राज्य शासनाच्या शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी विविध परीक्षा केंद्रांना भेटी देऊन परीक्षेच्या कामकाजाची पाहणी केली. जिल्हास्तरीय अधिकारी, शिक्षणाधिकारी, प्राचार्य, गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी आणि केंद्रप्रमुखांनीही परीक्षा केंद्रांना भेटी दिल्या. शिक्षक संघटना, शाळांचे मुख्याध्यापक आणि शिक्षकांनी परीक्षेचे नियोजन करून ही प्रक्रिया पूर्ण केली.