शरद सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर, उपाध्यक्षपदी पोपट भोकरे यांची निवड
schedule26 Oct 26 person by visibility 8 categoryउद्योग
जयसिंगपूर : नरंदे येथील शरद सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर यांची तर उपाध्यक्षपदी पोपट आण्णासो भोकरे (कवठेसार)यांची निवड करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपजिल्हाधिकारी अर्चना नष्टे यांनी काम पाहिले. कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक सलग पाचव्यांदा बिनविरोध झाली. निवडीनंतर कारखाना कार्यस्थळावर फटाक्यांची आतषबाजी करीत जल्लोष करण्यात आला.
कारखान्याचे संस्थापक स्वर्गीय शामराव पाटील यांच्या निधनानंतर चार निवडणुका राजेंद्र पाटील यांच्या नेतृत्त्वाखाली बिनविरोध झाल्या. नूतन संचालक मंडळात पाच नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली. निवडीनंतर अध्यक्ष,उपाध्यक्ष व संचालक यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलताना आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर म्हणाले, शरद सहकारी साखर कारखान्याने स्थापनेपासून ऊस उत्पादक शेतकरी सभासद यांच्या प्रगतीला प्राधान्य देत कारभार केला आहे.ऊसाला चांगला दर देत तो वेळेवर शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केला आहे.विश्वासार्हता जोपासून पारदर्शक कारभार करीत सहकार क्षेत्रात कारखान्याने नावलौकिक पटकाविला आहे. सभासदांशी आपुलकीचे ऋणानुबंध निर्माण करून त्यांच्या विकासाला पाठबळ दिले आहे. त्यामुळे बिनविरोध निवडीची परंपरा कायम ठेवण्यात यश आले.चालू हंगामात पूर्ण कार्यक्षमतेने कारखाना गाळप करेल. शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त ऊस कारखान्याकडे गळीतासाठी पाठवावा.
यावेळी नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर, युवा नेते आदित्य पाटील यड्रावकर,सुभाषसिंग रजपुत,प्रकाश पाटील टाकवडेकर सर्व संचालक प्रमुख उपस्थित होते. स्वागत कार्यकारी संचालक मोतीलाल पट्टणकुडे यांनी तर सूत्रसंचालन कार्यालयीन अधिक्षक अनिल पाटील यांनी केले. मुख्यकार्यकारी अधिकारी बी. ए.आवटी यांनी आभार मानले.