फोंडे यांच्यावरील कारवाई ही तर हुकूमशाही : आमदार सतेज पाटील
schedule08 Apr 25 person by visibility 324 categoryराजकीय

कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिका प्राथमिक शिक्षण समितीकडील सहायक शिक्षक गिरीष आनंदा फोंडे यांना शुक्रवारी तडकाफडकी निलंबित करण्यात आले. कोल्हापूर जिल्ह्यात सुरू असलेल्या शक्तिपीठ महामार्गाच्या विरोधात फोंडे यांनी जन आंदोलन उभे केले आहे. फोंडे यांचा आवाज बंद करण्यासाठी सरकारने सुद्बुद्धीने केलेली ही कारवाई म्हणजे हुकूमशाहीचे लक्षण आहे, अशी जोरदार टीका काँग्रेसचे विधानपरिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी व्यक्त केली.
कोल्हापूर मनपा आयुक्त यांनी कोणताही खुलासा न घेता फोंडे यांच्यावर कारवाई केली. त्यामुळे कोल्हापुरातील लोक हे जर्मनी व इटलीतील निरंकुश हुकूमशाही अनुभवत असल्याचे पाटील म्हणाले. . गिरीश फोंडे यांनी यापूर्वी शिवाजी विद्यापीठापासून ते जगातील कानाकोपऱ्यात विद्यार्थी युवक चळवळीचे नेतृत्व केले आहे. पन्नासहुन अधिक गावांमध्ये त्यांनी दारूबंदी केली आहे. शाळा वाचवण्यासाठी व विद्यार्थी शिक्षकांच्या हक्कासाठी ते अग्रेसर राहिले आहेत. पर्यावरण चळवळीत सक्रिय आहेत. जातीअंतासाठी त्यांनी आंतरजातीय चळवळ उभी केली आहे. अशा व्यक्तीविरोधात सरकार सुद्बुद्धीने कारवाई करत असेल तर ते निषेधार्थ आहे.
कोल्हापूर ही लढवय्याची भूमी आहे. अशा कितीही कारवाया केल्या तरी जनतेच्या मनातील आवाज या सरकारला बंद करता येणार नाही. कोल्हापूरची जनता फोंडे यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहून ही लढाई लढेल, या शब्दात आमदार पाटील यांनी फोंडे यांच्यावर झालेल्या कारवाईचा जाहीर निषेध केला