कोल्हापूर पोलिसांची धडक कारवाई: कुख्यात 'दम मारो दम' गँगवर 'मोका' अंतर्गत कारवाई मंजूर!
schedule04 Nov 26 person by visibility 131 categoryगुन्हे
कोल्हापूर : कोल्हापूर शहर, उपनगरे आणि पर्यटन स्थळांच्या परिसरात नागरिकांना व प्रवाशांना शस्त्रांचा धाक दाखवून लुटणाऱ्या तसेच दहशत माजविणाऱ्या गुन्हेगारी टोळ्यांविरुद्ध कोल्हापूर जिल्हा पोलीस दलाने कठोर पावले उचलली आहेत. राजारामपुरी पोलीस ठाणे हद्दीतील राजाराम तलाव परिसरात घडलेल्या जबरी दरोड्याच्या गुन्ह्यात सक्रिय असलेल्या कुख्यात 'दम मारो दम' या संघटित गुन्हेगारी टोळीविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम, १९९९ (मोका) अन्वये वाढीव कलमांचा समावेश करून तपास करण्यास विशेष पोलीस महानिरीक्षक, कोल्हापूर परिक्षेत्र, कोल्हापूर यांनी पूर्वपरवानगी दिली आहे.
◼️काय आहे प्रकरण?
दिनांक २७ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी १८:०० ते १८:३० वाजण्याच्या सुमारास फिर्यादी हे राजाराम तलाव समोरील रोडवरून सरनोबतवाडीकडे जात असताना लघुशंकेसाठी थांबले होते. त्यावेळी दोन मोटरसायकलवरून आलेल्या टोळीतील इसमांनी फिर्यादीस अचानक गाठून शिवीगाळ व जबरदस्त मारहाण केली. तसेच जिवे मारण्याची धमकी देऊन त्यांच्या गळ्यातील अंदाजे १,००,०००/- रुपये किमतीची १० ग्रॅम वजनाची सोन्याची साखळी जबरीने हिसकावून पसार झाले होते. याप्रकरणी राजारामपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
◼️पाचही आरोपी जेरबंद
गुन्ह्याचा तपास करत असताना स्थानिक गुन्हे शाखा व राजारामपुरी पोलीस ठाण्याच्या पथकाने नियोजनबद्ध सापळा रचून खालील पाचही आरोपींना शिताफीने जेरबंद केले आहे:
१. सुनील वसंत वाळकुंजे (वय २२ वर्षे, रा. धनगर गल्ली, उचगांव, ता. करवीर) - टोळी प्रमुख
२. रोहित रघुनाथ जाधव (वय २४ वर्षे, रा. मणेरमळा, विठाई कॉलनी, उचगांव, ता. करवीर) - टोळी सदस्य
३. प्रफुल्ल सर्जेराव गजबज (वय १९ वर्षे, रा. सरनोबतवाडी, ता. करवीर) - टोळी सदस्य
४. साद फारुख बेपारी (वय १९ वर्षे, रा. ९ नंबर वस्ती, मुडशिंगी, ता. करवीर) - टोळी सदस्य
५. रोहन रुपेश पाटील (वय २२ वर्षे, रा. शिवशक्ती स्पोर्ट्स चौक, उचगांव, ता. करवीर) - टोळी सदस्य
सध्या सर्व आरोपी न्यायलयीन कोठडीत (कळबा मध्यवर्ती कारागृह) आहेत. तपास पथकाने आरोपींच्या निवेदनावरून गुन्ह्यात जिरवलेले लुटलेल्या सोन्याच्या साखळीचे एकूण ८.१६० ग्रॅम वजनाचे तीन तुकडे (किंमत अंदाजे रु. ७७,५००/-), गुन्ह्यात वापरलेली पॅशन मोटरसायकल आणि हिरो स्प्लेंडर मोटरसायकल (विना नंबरप्लेट) असा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
टोळीचा गुन्हेगारी इतिहास व 'मोका'ची पार्श्वभूमी
सदर टोळीचा प्रमुख सुनील वसंत वाळकुंजे याने आर्थिक लाभासाठी तरुणांची संघटित टोळी ('दम मारो दम' गँग) तयार करून कोल्हापूर शहर, करवीर व लगतच्या भागात दहशत निर्माण केली होती. निर्जन रस्त्यांवर पाळत ठेवून वाटसरूंना लूटणे हा या टोळीचा मुख्य उद्देश होता. टोळीप्रमुख व सदस्याविरुद्ध मागील १० वर्षांत खुनाचा प्रयत्न, प्राणघातक शस्त्रांचा वापर, खंडणी, जबरी चोऱ्या व घरफोडी यांसारखे ३ वर्षांपेक्षा जास्त शिक्षेची तरतूद असलेले अनेक गंभीर गुन्हे दाखल असून न्यायालयाने त्यांची दखल घेतली होती.
या सर्व गोष्टींचा विचार करून पोलीस अधीक्षक, कोल्हापूर नीलोत्पल यांनी सदर टोळीचे समूळ उच्चाटन करण्यासाठी मोका अंतर्गत कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर राजारामपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विकास जाधव यांनी प्रस्ताव तयार करून तो पोलीस अधीक्षक यांच्यामार्फत सादर केला होता. या प्रस्तावाची व पुराव्यांची सखोल छाननी करून पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या शिफारसीनुसार विशेष पोलीस महानिरीक्षक रंजन कुमार शर्मा यांनी 'मोका' अंतर्गत कारवाईची पूर्वपरवानगी दिली असून, पुढील तपास शहर उपविभाग, कोल्हापूर यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.
◼️पोलिसांचे नागरिकांना आवाहन
कोल्हापूर शहर व जिल्ह्यात अशा प्रकारे टोळी तयार करून दहशत माजविणाऱ्या, खंडणी उकळणाऱ्या व गुन्हेगारी कारवाया करणाऱ्या समाजकंटकांचे समूळ उच्चाटन केले जावे, यासाठी नागरिकांनी कोणत्याही गुन्हेगारांच्या दहशतीला बळी न पडता निर्भयपणे पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले असून माहिती देणाऱ्यांची नावे गुप्त ठेवण्यात येतील असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.