डॉ. वसंतराव मोरे, डॉ. शरद भूथाडिया यांना 'ब्रँड कोल्हापूर जीवनगौरव' प्रदान; ३० मान्यवरांचा गौरव
schedule04 Nov 26 person by visibility 131 categoryसामाजिक
कोल्हापूर : इतिहास, कला, संस्कृती आणि कर्तृत्वाचा समृद्ध वारसा लाभलेल्या कोल्हापूरच्या भूमीत एक वेगळीच ऊर्जा आहे, असे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ कादंबरीकार 'पानिपतकार' विश्वास पाटील यांनी केले. 'ब्रँड कोल्हापूर' उपक्रमाच्या सातव्या वर्षाच्या निमित्ताने आयोजित सोहळ्यात ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. वसंतराव मोरे आणि ज्येष्ठ दिग्दर्शक, रंगकर्मी डॉ. शरद भूथाडिया यांना 'ब्रँड कोल्हापूर जीवनगौरव' पुरस्काराने अत्यंत दिमाखात सन्मानित करण्यात आले.
विश्वास पाटील यांच्या हस्ते आणि 'ब्रँड कोल्हापूर'चे संकल्पक आमदार सतेज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडला. जीवनगौरव पुरस्कारांसोबतच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर आपल्या उत्तुंग कर्तृत्वाचा ठसा उमटवणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यातील विविध क्षेत्रांतील ३० गुणवंत मान्यवरांना 'ब्रँड कोल्हापूर' पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
◼️कोल्हापूरशी अनोखे नाते : विश्वास पाटील
आपल्या प्रमुख भाषणात विश्वास पाटील यांनी कोल्हापूरच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक संदर्भांना उजाळा देत उपस्थितांना खिळवून ठेवले. कोल्हापूरच्या मातीतील गुणांची प्रशंसा करत त्यांनी या भूमीशी असलेले आपले नाते अधोरेखित केले.
जिल्ह्याचा नावलौकिक वाढवला : सतेज पाटील
'ब्रँड कोल्हापूर'चे संकल्पक आमदार सतेज पाटील यावेळी बोलताना म्हणाले की, "या उपक्रमाचे हे सातवे वर्ष असून दरवर्षी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या हिऱ्यांचा शोध घेऊन त्यांचा सन्मान केला जातो. यंदा पुरस्कार प्राप्त सर्वच मान्यवरांनी आपापल्या कामगिरीने कोल्हापूर जिल्ह्याचा नावलौकिक केवळ देशातच नव्हे तर जागतिक पातळीवर वाढवला आहे."
या दिमाखदार सोहळ्यास शहर व जिल्ह्यातील विविध क्षेत्रांतील मान्यवर, नागरिक व कलाप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
🟧 ब्रेड कोल्हापूर जीवन गौरव २०२६
इतिहास संशोधक वसंतराव मोरे (शाहू चौक, बोंद्रेनगर, फुलेवाडी) यांना मराठा साम्राज्य, छत्रपती शिवाजी महाराज व पानिपतच्या युद्धाच्या इतिहासावरील मोलाचे संशोधन तसेच हरियाणातील 'रोर मराठा' (Ror Maratha) समुदायाचा शोध व त्यांचा पानिपतच्या युद्धाशी असलेला ऐतिहासिक संबंध समोर आणल्याबद्दल, तर ज्येष्ठ दिग्दर्शक व रंगकर्मी डॉ. शरद भुताडिया (वैभव हौ. सोसायटी, शाहू टोल नाका जवळ) यांना जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.
◼️क्रीडा व विशेष यश (ब्रेड कोल्हापूर २०२६)
मुंबई येथील खुल्या राष्ट्रीय अजिंक्यपद लॉन टेनिस स्पर्धेत उपविजेतेपद पटकावणारे संदेश दत्तात्रय कुरळे (कोल्हापूर जिल्हा टेनिस असोसिएशन); आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ मधील महिलांच्या १० मीटर एअर रायफल सांघिक प्रकारात रौप्य पदक विजेती सोनम मस्कर (पुष्पनगर); सिंगापूर येथील स्पर्धेत 'नमस्ते भारत ब्युटी क्वीन'चा किताब पटकावणारी पूजा पावसकर (कोल्हापूर); "The Quiet Warmth" या शिल्पकृतीची लंडन येथील प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय शिल्पप्रदर्शनासाठी निवड झालेला शिल्पकार शुभम सुतार (कोल्हापूर); अहमदाबाद येथील पहिल्या जागतिक योगासन अजिंक्यपद स्पर्धेत रौप्य पदक विजेता रोहित चव्हाण (शिवाजी पेठ); अमेरिकेतील लास वेगास येथे झालेल्या २३ वर्षांखालील जागतिक कुस्ती स्पर्धेत ७२ किलो वजनी गटात रौप्य पदक विजेती अमृता पुजारी (शिरोळ); आशिया हॉकी चषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात एकमेव गोल नोंदवत 'प्लेअर ऑफ द मॅच' ठरलेली सानिका माने (नूल); लास वेगास येथील २३ वर्षांखालील जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत ५५ किलो ग्रिको रोमन प्रकारात रौप्य पदक विजेता विश्वजित मोरे (सरवडे); एशियन चॅम्पियनशिप शूटिंग स्पर्धेत १० मीटर एअर रायफल प्रकारात जागतिक रेकॉर्डसह २ सुवर्ण पदके पटकावणारी शांभवी श्रावण क्षीरसागर (कोल्हापूर); तलवारबाजी स्पर्धेत सलग पाचव्या वर्षी राष्ट्रीय स्पर्धेत पदक पटकावणारी पहिली महाराष्ट्रीयन खेळाडू व आशियाई/जागतिक कॅडेट फेन्सिंगसाठी भारतीय संघात निवड झालेली जिजाऊ पाटील (आसगाव); 'सेरेन्डिपिटी स्पेस' या स्पेस फार्मा स्टार्टअपच्या सहसंस्थापक व मायक्रो ग्रॅव्हेटीमध्ये औषध निर्मितीवर संशोधन करणाऱ्या मोनिका एकल (चिमगाव); आधुनिक जिओ स्पॅशियल तंत्रज्ञान वापरून महापुराचे रिअलटाईम मॉनिटरिंग व पूर्वसूचना यंत्रणा विकसित केल्याबद्दल एसरी इंडियाच्या यंग स्कॉलर स्पर्धेत देशात प्रथम आलेली स्वप्नाली मगदूम (कोल्हापूर); इंडियन मिलिटरी अकॅडमीच्या ९३ वर्षांच्या इतिहासात प्रथमच महिला अधिकारी कॅडेट म्हणून प्रशिक्षण पूर्ण करून लेफ्टनंट बनलेली सई जाधव (जयसिंगपूर); केमन बेटावरील आंतरराष्ट्रीय शेफ स्पर्धेत ३०० शेफमधून उत्कृष्ट शेफ ठरलेला जितेंद्र करंबे (तटाकडील तालीम, शिवाजी पेठ); हरियाना येथील १९ वर्षांखालील राष्ट्रीय स्पर्धेत ३००० मीटर चालण्याच्या स्पर्धेत देशात प्रथम आलेली वेदांती मनगुतकर (किणी); दिल्ली येथील ओपन ग्रँड मास्टर बी कॅटेगरी बुद्धिबळ स्पर्धेत संयुक्तपणे तिसरा/दहावा क्रमांक मिळवणारा हृषीकेश कबनुरकर (शाहूपुरी); व्हिएतनाम येथील आशियाई कुस्ती स्पर्धेत सुवर्ण पदक विजेती ऋतुजा गुरव (छत्रपती शिवाजी स्टेडियम खेलो इंडिया कुस्ती केंद्र); तुर्कीये येथील ITF W15 महिला टेनिस स्पर्धेत दुहेरीचे विजेतेपद पटकावणारी मधुरिमा सावंत (दौलतवाडी); थायलंड येथील आशियाई कुस्ती स्पर्धेत ७५ किलो ग्रिको रोमन प्रकारात रौप्य पदक विजेता गौरव पाटील (कोपार्डे); व्हिएतनाम येथील आशियाई कुस्ती स्पर्धेत रौप्य पदक विजेता आदित्य जाधव (नरतवडे); स्लोव्हाकिया येथील जागतिक अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत ५७ किलो वजनी गटात कांस्य पदक विजेती तन्वी मगदूम (मुरगूड); आणि हैदराबाद येथील २५ व्या राष्ट्रीय पॅरा स्विमिंग चॅम्पियनशिपमध्ये ५० मी. ब्रेस्ट स्ट्रोकमध्ये द्वितीय व बॅक स्ट्रोकमध्ये तृतीय क्रमांक मिळवणारा देवेन महेंद्र पवार यांचा गौरव करण्यात आला.
🔸️स्पर्धा परीक्षा व व्यावसायिक यश (होस्ट ब्रेड कोल्हापूर २०२६)
युपीएससी (UPSC) परीक्षेत एकाच वर्षात दोन पदांवर निवड (आयएएस ऑल इंडिया रँक ६०१ व फॉरेस्ट सर्व्हिस रँक ६२) मिळवणारे रोहित मालवेकर (कागल); युपीएससी परीक्षेत ३४९ वी रँक मिळवणारा हर्षवर्धन पाटील (तुरुकवाडी, शाहूवाडी); प्रोजेक्ट मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट (PMI) द्वारे जगभरातील ३५ वर्षांखालील ५० गुणवंतांच्या यादीत निवड झालेली वैभवी चव्हाण (कसबा बावडा); स्वित्झर्लंड येथील 'वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम' (WEF) २०२६ च्या वार्षिक परिषदेसाठी निवड झालेली कोल्हापूरची सर्वात तरुण प्रतिनिधी व ग्लोबल शेपर्सची क्युरेटर जुही अरुण धारवाडे (कोल्हापूर); आयर्नमॅन किताब विजेती डॉ. नंदिता परांजपे-जोशी (कोल्हापूर); ऑस्ट्रेलिया कबड्डी टीमचे मुख्य फिजीओथेरपिस्ट डॉ. ऋषिकेश पोळ (कोल्हापूर); साऊथ आफ्रिका कबड्डी टीमचे मुख्य फिजीओथेरपिस्ट डॉ. महेश शिंदे (कोल्हापूर); युपीएससी परीक्षेत देशात ६१ वा क्रमांक मिळवणारा ऋषिकेश आलासे (जयसिंगपूर); बेताच्या परिस्थितीतून युपीएससी परीक्षेत ८१७ वी रँक मिळवणारा प्रथमेश शिंदे (नवे पारगाव); आणि दुर्गम धनगरवाड्यातून येत युपीएससी परीक्षेत २५२ वा क्रमांक मिळवणारा पांडुरंग फोंडे (धनगर वाडा) यांचा विशेष सन्मान करण्यात आला.