स्व. आनंदराव पाटील-चुयेकर यांच्या पुढील स्मृतीदिनी २५ लाख लिटर दूध संकलनाने अमृत कलश पूजन होईल : हसन मुश्रीफ
schedule16 Jan 26 person by visibility 59 categoryउद्योग
▪️‘गोकुळ’ चा दुग्धव्यवसायातील नावलैकिक संपूर्ण देशात पोहोचवण्याचा संकल्प : प्रकाश आबिटकर
▪️स्व. आनंदराव ज्ञा. पाटील (चुयेकर) यांची १२ वी पुण्यतिथीच्या निमित्याने
▪️२० लाख लिटर दूध संकलन पूर्तीचा कलश पूजन कार्यक्रम संपन्न
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्या. कोल्हापूर (गोकुळ) च्या वतीने गोकुळचे शिल्पकार स्व. आनंदराव ज्ञा.पाटील (चुयेकर) यांच्या १२ व्या पुण्यतिथीनिमित्य प्रतिदिन २० लाख लिटर्स दूध संकलन पूर्तीचा अमृत कलश पूजन कार्यक्रम गोकुळ प्रकल्प गोकुळ शिरगाव येथे संपन्न झाला. हा अमृत कलशाचे पूजन गोकुळ मध्ये कार्यरत असलेले ११ ज्येष्ठ कर्मचारी यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री नामदार हसन मुश्रीफ, सार्वजनिक आरोग्य मंत्री कोल्हापूरचे पालकमंत्री नामदार प्रकाश आबिटकर, माजी गृहराज्यमंत्री आमदार सतेज उर्फ बंटी पाटील गोकुळचे चेअरमन नविद मुश्रीफ व सर्व संचालक मंडळ, प्रमुख मान्यवर उपस्थितीत होते.
यावेळी स्वर्गीय आनंदराव पाटील चुयेकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास मान्यवरांचा हस्ते पुष्पहार अपर्ण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री नामदार हसन मुश्रीफसो म्हणाले, “मागील वर्षी स्व. आनंदराव पाटील चुयेकर यांच्या पुण्यतिथीला १८ लाख लिटर दूध संकलनाचे अमृत कलश पूजन केले होते. त्यावेळी २० लाख लिटरचा संकल्प केला होता आणि आज तो यशस्वीरीत्या पूर्ण झाला आहे, याचा मला अत्यंत आनंद आहे.”
ते पुढे म्हणाले की, आज एकूण २१ लाख ९६ हजार लिटर दूध संकलन झाले आहे. या यशामागे गोकुळच्या दूध उत्पादक शेतकरी, अधिकारी, कर्मचारी आणि संचालक मंडळाचे मोठे योगदान आहे. सर्वांचे मनापासून अभिनंदन केले, व पुठे बोलताना म्हणाले “दूध उत्पादक हा केंद्रबिंदू मानून संघाच्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी प्रत्येक गावात सक्रियपणे काम करणे गरजेचे आहे. चारा व्यवस्थापन, आधुनिक तंत्रज्ञान, म्हैशींचे आरोग्य यावर विशेष लक्ष दिले पाहिजे.” म्हैस दूध वाढीसाठी कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेने मोठी भूमिका घेतली असून दोन जातिवंत म्हैशी खरेदीसाठी गोकुळच्या सुपरवायझरच्या शिफारशीवर विनातारण कर्ज योजना उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच अण्णासाहेब पाटील महामंडळ तसेच इतर महामंडळाच्या माध्यमातून अर्थसहाय्य देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. दूध उत्पादकांनी या योजनांचा लाभ घ्यावा,” असे आवाहन त्यांनी केले.
संघाच्या पायाभूत सुविधा व विस्तार, आईस्क्रीम प्रकल्प, पुणे व मुंबईतील विस्तार योजना, तसेच दूध संकलनाचा मासिक आढावा नियमितपणे घेण्याचे निर्देश त्यांनी संचालक मंडळाला दिले. स्व. आनंदराव पाटील-चुयेकर यांच्या पुढील स्मृतीदिनी २५ लाख लिटर दूध संकलनाने अमृत कलश पूजन होईल,असा मला पूर्ण विश्वास आहे,” असे मत यांनी व्यक्त केले.
यावेळी सार्वजनिक आरोग्य मंत्री व कोल्हापूरचे पालकमंत्री नाम.प्रकाश आबिटकर म्हणाले की, गोकुळ दूध संघाचा सर्वसामान्य दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या आयुष्यात अनन्यसाधारण महत्त्व आहे. या विश्वासाच्या बळावरच गोकुळने प्रतिदिन २० लाख लिटर दूध संकलनाचा ऐतिहासिक टप्पा पूर्ण केला असून, ही कामगिरी कोल्हापूर जिल्ह्यासाठी अभिमानास्पद आहे. गोकुळचे एकूण अर्थकारण शेतकऱ्यांच्या हिताशी थेट जोडलेले असून, त्यामुळेच हा संघ सर्वसामान्य दूध उत्पादकांसाठी महत्त्वपूर्ण ठरत आहे. सत्तेवर आल्यानंतर त्या काळात गोकुळचे दूध संकलन १२ ते १३ लाख लिटर इतके होते. मात्र, २० लाख लिटर दूध संकलनाचा संकल्प सर्वांनी एकत्रितपणे केला आणि तो आज यशस्वीपणे पूर्ण झाला आहे. आज महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या दूध संघांमध्ये गोकुळचा अग्रक्रम लागतो.
भविष्यात अमूलप्रमाणे देशपातळीवर आदर्श ठरेल असे कार्य गोकुळने करावे, अशी आमची संकल्पना आहे. त्यासाठी सर्व संचालक, अधिकारी, कर्मचारी व दूध उत्पादकांनी एकत्र येऊन गोकुळचे दुग्धव्यवसायातील नाव संपूर्ण देशभर पोहोचवण्याचा संकल्प करावा, असे आवाहन त्यांनी केले. दूध संकलनाबरोबरच नवीन दुग्धजन्य पदार्थांची निर्मिती गोकुळच्या अर्थकारणाला अधिक बळ देणारी आहे. या क्षेत्रात गोकुळने घेतलेला पुढाकार कौतुकास्पद आहे असे मनोगत पालकमंत्री आबिटकर यांनी व्यक्त केले.
यावेळी बोलताना आमदार सतेज पाटील म्हणाले, “आज गोकुळ दूध संघाने प्रतिदिन २० लाख लिटर दूध संकलनाचा ऐतिहासिक टप्पा पूर्ण केला असून, ही कामगिरी कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वसामान्य दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या मेहनतीची, विश्वासाची आणि संघाच्या सक्षम नेतृत्वाची पावती आहे.
ते पुढे म्हणाले, “गोकुळमध्ये सत्ता परिवर्तन झाल्यानंतर शेतकऱ्याला अधिक दर मिळालाच पाहिजे, ही ठाम भूमिका घेण्यात आली. मात्र केवळ दरवाढ पुरेशी नसून दूध संकलन व विक्री दोन्ही वाढवणे आवश्यक होते. त्या दिशेने प्रामाणिक प्रयत्न केल्यामुळे आज २० लाख १६ हजार लिटर दूध संकलनाचे उद्दिष्ट पूर्ण झाले आहे.
स्व. आनंदराव पाटील चुयेकर साहेबांचा कारभार विश्वासावर आधारित होता. संघाची संपत्ती आपल्या शेतासारखी जपावी, ही त्यांची शिकवण आजही मार्गदर्शक आहे. जुन्या जाणत्या मंडळींच्या व शेतकऱ्यांच्या योगदानावर उभा राहून भविष्यात २५ लाख लिटर दूध संकलनाचा टप्पा गाठणे निश्चितच शक्य आहे. लोकाभिमुख आणि शेतकरीकेंद्री कारभार पुढील काळातही प्रामाणिकपणे सुरू राहील.
यावेळी संघाचे चेअरमन नविद मुश्रीफ म्हणाले, गोकुळचे माजी चेअरमन स्व.आनंदराव पाटील चुयेकर साहेबांच्या पुण्यतिथीच्या दिवशी गोकुळने प्रतिदिन २० लाख लिटर दूध संकलनाचा ऐतिहासिक टप्पा पूर्ण केला हा क्षण गोकुळ कुटुंबासाठी अभिमानाचा आहे. अवघ्या ७०० लिटर दूध संकलनापासून सुरू झालेला गोकुळचा प्रवास आज कोल्हापूर जिल्ह्यातील लाखो दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या विश्वासावर उभा आहे. ग्रामीण भागातील दूध शहरी बाजारपेठेत जावे आणि शहरातील पैसा ग्रामीण भागात यावा, ही स्व. चुयेकर साहेबांची दूरदृष्टी होती. त्यांच्या मार्गदर्शनामुळेच मुंबई व पुण्यासारख्या मोठ्या बाजारपेठांमध्ये गोकुळचे दूध पोहोचले. आज मुंबईत प्रतिदिन ९ लाख तर पुण्यात ५ लाख लिटर दूध विक्री होत आहे.”
अत्याधुनिक ४० टन क्षमतेचा टीएमआर चारा प्रकल्प, सौर ऊर्जा, बायोगॅस, स्लरीवर आधारित सेंद्रिय खत निर्मिती, पशुखाद्य, सीएनजी, पेट्रोल पंप, शॉपी नेटवर्क व नवी मुंबई-पुणे विस्तार प्रकल्पांमुळे संघ अधिक सक्षम होत आहे. शेतकऱ्यांसाठी ३२ विविध योजना राबविल्या जात असून, येत्या काळात २५ लाख लिटर दूध संकलनाचा टप्पा नक्कीच पूर्ण करू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कार्यक्रमाच्या शेवटी छत्रपती संभाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनी त्यांना अभिवादन करत त्यांनी उपस्थितांचे आभार मानले. आघाडीचे सर्व नेते मंडळी यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली गेल्या चार वर्षात राबविलेल्या सभासद हिताच्या विविध योजना, प्रभावी कामकाज, संचालक मंडळाचा काटकसरीचा कारभार व माझ्या सर्व सहकारी संचालक यांनी दिलेल्या बहुमोल सहकार्याने तसेच दूध उत्पादक, दूध संस्था, ग्राहक, वितरक, कर्मचारी यांच्या योगदानाने ‘गोकुळ’ची दिमाखात वाटचाल सुरु आहे याचा मला मनस्वी आनंद आहे असे मनोगत व्यक्त केले.
यावेळी गोकुळ प्रकल्प येथे नवीन बसवण्यात आलेल्या २ मेट्रिक टन प्रतितास क्षमतेचा अत्याधुनिक कंटीन्युअस बटर मेकींग मशिन, २००० केव्हीए नवीन जनरेटर सेट व गडमुडशिंगी येथील महालक्ष्मी टी.एम.आर.प्लांट विस्तारीत युनिट चे मान्यवरांच्या हस्ते पूजन करून ते कार्यान्वित करण्यात आले. २० लाख लिटर दूध संकलन पूर्ण झाल्याबद्दल गोकुळचे चेअरमन नविद मुश्रीफ यांचा सत्कार शाहू छत्रपती दूध संस्था शिरोली, ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील यांचा सत्कार हनुमान दूध संस्था वडकशिवाले, ज्येष्ठ संचालक अरुण डोंगळे यांचा सत्कार ज्योतिर्लिंग दूध संस्था कातळेवाडी तसेच सर्व संचालक मंडळाचा सत्कार दूध संस्था सचिव संघटनेच्या वतीने करण्यात आला.
या कार्यक्रमाचे स्वागत ज्येष्ठ संचालक अरुण डोंगळे यांनी व प्रास्ताविक ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील यांनी केले. आभार संघाचे संचालक शशिकांत पाटील चुयेकर यांनी मानले.
या कार्यक्रमाला उपस्थित राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री नामदार हसन मुश्रीफ, सार्वजनिक आरोग्य मंत्री कोल्हापूरचे पालकमंत्री नामदार प्रकाश आबिटकर, माजी गृहराज्यमंत्री आमदार सतेज पाटील, माजी खासदार निवेदिता माने, गोकुळचे चेअरमन नविद मुश्रीफ, ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील, अरुण डोंगळे, के.डी.सी.सी.बँकेचे संचालक भैय्या माने, संचालक बाबासाहेब चौगले, अभिजित तायशेटे, अजित नरके, शशिकांत पाटील–चुयेकर, किसन चौगले, रणजितसिंह पाटील, नंदकुमार ढेंगे, कर्णसिंह गायकवाड, संभाजी पाटील, प्रकाश पाटील, सुजित मिणचेकर, बयाजी शेळके, बाळासो खाडे, चेतन नरके, युवराज पाटील, मुरलीधर जाधव, संचालिका श्रीमती अंजना रेडेकर, कार्यकारी संचालक डॉ.योगेश गोडबोले व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.