डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठाचा सोमवारी तिसरा दीक्षांत समारंभ
schedule15 Jan 26 person by visibility 68 categoryशैक्षणिक
▪️उद्योगपती संजय किर्लोसकर मुख्य अतिथी
विलास शिंदे, भावित नाईक यांना डॉक्टरेट; ९१२ विद्यार्थ्यांना मिळणार पदवी
कोल्हापूर : डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठ, तळसंदेचा तिसरा दीक्षांत समारंभ सोमवार दिनांक १९ जानेवारी २०२६ रोजी कुलपती डॉ. संजय डी. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होत आहे. उद्योगपती किर्लोस्कर ब्रदर्स लिमिटेड पुणेचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक संजय किर्लोस्कर या समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असून दीक्षांत भाषण करणार आहेत.
यावेळी सह्याद्री फार्म्स प्रोड्युसर कंपनीचे संस्थापक आणि अध्यक्ष विलास शिंदे यांना डॉक्टर ऑफ लिटरेचर्स (डि.लीट.) तर ओंस्ट्रो टेक्नोलॉजी प्रा. लि.चे सहसंस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी भावित नाईक यांना डॉक्टर ऑफ सायन्स (डी.एस्सी.) या मानद पदवीने सन्मानित केले जाणार आहे. तळसंदे येथील डी. वाय. पाटील एज्युकेशनल सिटी येथे सायंकाळी ५ वाजता दीक्षांत समारंभ होणार असल्याची माहिती डी. वाय. पाटील ग्रुपचे विश्वस्त ऋतुराज संजय पाटील व कुलगुरू प्रा. डॉ. ए. के. गुप्ता यांनी दिली. यावेळी कुलसचिव प्रा. डॉ. जे. ए. खोत, परीक्षा नियंत्रक डॉ. गुरुनाथ मोटे उपस्थित होते.
डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठ स्थापना १ जुलै २०२१ रोजी झाली. केवळ चार वर्षाच्या कालावधीत विद्यापीठाने शैक्षणिक व संशोधन क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. विद्यापीठात स्कूल ऑफ इंजीनिअरिंग अँड टेक्नोलॉजी, स्कूल ऑफ मॅनेजमेंट विभागातर्गत सध्या ४ हजाराहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत असल्याचे डॉ. गुप्ता यांनी यावेळी सांगितले.
▪️९१२ विद्यार्थ्यांना मिळणार पदवी
दीक्षांत समारंभात एकूण ९१२ विद्यार्थ्यांना पदवी व पदव्युत्तर पदवी प्रदान केली जाणार आहे. यामध्ये ११ विद्यार्थ्यांना पीएच. डी. देण्यात येणार असून यावेळी १५ विद्यार्थ्याना सुवर्ण पदकाने गौरवण्यात येणार असल्याची माहिती डॉ. गुप्ता यांनी यावेळी दिली. विद्यापीठाच्या ७० टक्केहून अधिक विद्यार्थ्यांना प्लेसमेंट मिळाली आहे. १०० हून अधिक संशोधन असून २४ पेटंट प्राप्त झाली आहेत. अनेक विद्यार्थी परदेशात उच्च शिक्षण घेत असल्याचे डॉ. गुप्ता यांनी सांगितले.
दीक्षांत समारंभाचे प्रमुख अतिथी संजय किर्लोस्कर हे चौथ्या पिढीतील उद्योगपती असून ते किर्लोस्कर ब्रदर्स लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक आहेत. ते ऑल इंडिया मॅनेजमेंट असोसिएशनचे अध्यक्ष आणि सीआयआय वेस्टर्न रीजनचे अध्यक्ष होते. ते महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अँड ॲग्रिकल्चरचे अध्यक्ष आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सल्लागार मंडळाचे अध्यक्ष आहेत. देश विदेशातील अनेक संस्थावर ते कार्यरत आहेत.
▪️विलास शिंदे यांना डी.लीट
दीक्षांत समारंभात विलास शिंदे यांना डी. लीट. पदवीने सन्मानीत केले जाणार आहे. पारंपरिक शेतकरी कुटुंबातून आलेल्या शिंदे यांनी शेतकऱ्यांना केवळ उत्पादक नव्हे तर मालक बनवण्याचा संकल्प केला. २०१० साली नाशिक येथे सह्याद्री फार्म्स फार्मर्स प्रोड्यूसर कंपनी लिमिटेड ही पूर्णतः शेतकरी मालकीच्या संस्थेची स्थापना झाली. आज सह्याद्री फार्म्स सुमारे ३० हजार शेतकऱ्यांसोबत कार्यरत असून, विशेषतः द्राक्ष निर्यातीत भारतातील अग्रगण्य संस्थांमध्ये गणना होते. शेतकरी सन्मान, शाश्वत व सन्मानजनक उत्पन्न, ग्रामीण रोजगार व संस्था उभारणीतील त्यांच्या योगदानाबद्दल डॉक्टर ऑफ लिटरेचरने सन्मानित केले जाणार आहे.
▪️भावित नाईक यांना डी. एस्सी. डॉक्टर ऑफ सायन्स पदवीने सन्मानित केले जणारे भावित नाईक हे गोव्यात सुरू झालेल्या आणि सध्या पोर्तुगालमध्ये मुख्यालय असलेल्या ओंस्ट्रो या जागतिक सॉफ्टवेअर कंपनीचे सहसंस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. ही कंपनी आज १०० पेक्षा अधिक देशांतील हजारो संस्थांना सेवा देते. डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, कोल्हापूर येथून संगणक अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केलेले नाईक हे Jobsoid Inc. (USA) या जागतिक भरती प्लॅटफॉर्मचे संस्थापक अध्यक्षही आहेत.
ASSOCHAM गोवा राज्य परिषदेच्या आयटी समितीचे अध्यक्ष म्हणून ते कार्यरत आहेत. रिअल इस्टेट, रिसॉर्ट विकास आणि सार्वजनिक क्षेत्रातील डिजिटल परिवर्तन प्रकल्पांमध्येही नेतृत्व भूमिका बजावली आहे.