कल्पनेपासून कृतीपर्यंत : केआयटीमध्ये उद्योजकतेचा प्रेरणादायी जागर
schedule25 May 26 person by visibility 123 categoryशैक्षणिक
🕳युवा उद्योजकांशी सु संवादातून विद्यार्थ्यांना मिळाली नवी दिशा
कोल्हापूर : “ मोठी स्वप्ने पाहा, जोखीम घ्या आणि कल्पनांना कृतीत उतरवा ” हा संदेश देणारा प्रेरणादायी ‘युवा उद्योजकांशी संवाद’ कार्यक्रम केआयटी अभियांत्रिकी प्रदत्त स्वायत्त महाविद्यालयाच्या मेकॅनिकल अभियांत्रिकी विभाग व ई-सेल यांच्या संयुक्त विद्यमाने तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांसाठी उत्साहात संपन्न झाला.उद्योग, संशोधन, तंत्रज्ञान आणि नवउद्योग क्षेत्रात कार्यरत यशस्वी उद्योजकांनी विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधत उद्योजकतेचा प्रवास, त्यातील संघर्ष, संधी, अपयश, नेतृत्व आणि भविष्यातील बदल यांवर मार्गदर्शन केले.
कार्यक्रमात सहभागी मान्यवरांमध्ये केआयटीचे १९९२ चे माजी विद्यार्थी आणि सॉफ्टवेअर क्षेत्रातील उद्योजक केदार पोतनीस, सुधाकर डेव्हलपर्सचे संचालक गंधार डिग्रजकर, हिंदुस्तान कास्टिंग्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी हेरंब मगदूम तसेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स क्षेत्रात आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्यरत अल्फा सिंग्युलॅरिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. विजय कानडे यांचा समावेश होता.
संवाद सत्रात मान्यवरांनी त्यांच्या प्रत्यक्ष अनुभवातून विद्यार्थ्यांना व्यवसाय उभारणी, जागतिक बाजारपेठ, संशोधन, तंत्रज्ञान आणि बदलत्या उद्योगविश्वातील संधी यांची ओळख करून दिली.
केदार पोतनीस यांनी उत्पादन अभियांत्रिकीपासून माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील त्यांच्या प्रवासाचा अनुभव सांगताना समस्या सोडवण्याच्या वृत्तीमधून व्यवसायाची निर्मिती कशी होते हे स्पष्ट केले. आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करताना विविध संस्कृती समजून घेण्याचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले.
गंधार डिग्रजकर यांनी दुसऱ्या पिढीतील उद्योजकांसमोरील आव्हाने, पारंपरिक व्यवसायाचे आधुनिक रूपांतर आणि तंत्रज्ञानाच्या साहाय्याने वाढ साधण्याबाबत अनुभव मांडले.
हेरंब मगदूम यांनी भारताचे जागतिक उत्पादन केंद्र म्हणून वाढते महत्त्व स्पष्ट करताना विद्यार्थ्यांनी तांत्रिक ज्ञानासोबत आर्थिक साक्षरता, व्यवस्थापन कौशल्ये आणि उद्योग समज विकसित करण्याची गरज अधोरेखित केली.
विजय कानडे यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता, संशोधन आणि नवकल्पनांचे भविष्य यावर भाष्य करत विद्यार्थ्यांना सातत्याने शिकत राहण्याचा आणि संशोधनात्मक दृष्टी विकसित करण्याचा संदेश दिला.
कार्यक्रमात पहिली आणि दुसरी पिढीतील उद्योजक, जोखीम व्यवस्थापन, स्टार्टअप फंडिंग, पेटंट, टीमवर्क, AI चे भविष्य, आर्थिक नियोजन आणि व्यवसायातील नवकल्पना यांसारख्या विषयांवर सखोल चर्चा झाली. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे प्रश्न विचारत उद्योगविश्वातील वास्तव समजून घेतले.
🟣 संपूर्ण सत्रातून विद्यार्थ्यांना पुढील महत्त्वाचे संदेश मिळाले —
• मोठे विचार करा, पण अंमलबजावणी तात्काळ सुरू करा
• कल्पनेपेक्षा कृती महत्त्वाची
• जोखीम घ्या, पण नियोजनपूर्वक
• तंत्रज्ञानासोबत मार्केटिंग आणि वित्तीय ज्ञान आवश्यक
• टीमवर्क आणि नेतृत्व ही यशाची गुरुकिल्ली
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यार्थी सोहम बिरंजे यांनी केले, तर पाहुण्यांचा परिचय विद्यार्थी सुयश तुपे यांनी करून दिला. मान्यवरांचे स्वागत पर्यावरणपूरक उपक्रमांतर्गत रोपटे देऊन करण्यात आले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रा. अमित वैद्य यांनी केले.
यावेळी विभागप्रमुख डॉ. उदय भापकर, डॉ. लिंगराज हादीमनी,अधिष्ठाता डॉ. अक्षय थोरवत तसेच प्रा. व्ही. के. देसाई, सर्व विभागांचे ई-सेल प्राध्यापक समन्वयक प्रमुख,सर्व विभागातील मिळून किमान १५० विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संस्थेचे अध्यक्ष साजित हुदली, उपाध्यक्ष सचिन मेनन, सचिव दीपक चौगुले, अन्य विश्वस्त तसेच संचालक डॉ. मोहन वनरोट्टी यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले.
कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली. या संवादातून विद्यार्थ्यांना उद्योजकतेकडे नव्या दृष्टीने पाहण्याची प्रेरणा मिळाली असून भविष्यात अधिकाधिक विद्यार्थी नवउद्योग आणि संशोधन क्षेत्राकडे वाटचाल करतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.