समाज कल्याण विभागाच्या विविध पुरस्कारांसाठी 15 फेब्रुवारी पर्यंत अर्ज करावेत
schedule04 Feb 25 person by visibility 208 categoryराज्य
कोल्हापूर : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत समाज कल्याण क्षेत्रामध्ये वैशिष्ट्यपुर्ण काम करणा-या व्यक्ती व स्वयंसेवी संस्थांना प्रोत्साहन मिळावे यासाठी विविध पुरस्कार देण्यात येतात. या अनुषंगाने सन 2023-24 (दि. 1 जानेवारी ते दि. 31 डिसेंबर 2023) या आर्थिक वर्षातील पुरस्कार मिळण्यासाठी पात्र असलेल्या इच्छुक व्यक्ती व संस्थांनी दि. 15 फेब्रुवारी 2025 रोजी सायंकाळी 6.15 वाजेपर्यंत सहायक आयुक्त, समाज कल्याण, कोल्हापूर कार्यालयात विहीत नमुन्यात अर्ज सादर करावेत, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त सचिन साळे यांनी केले आहे.
यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भुषण पुरस्कार, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे पुरस्कार, पद्मश्री कर्मवीर दादासाहेब गायकवाड पुरस्कार, संत रविदास पुरस्कार, शाहू, फुले, आंबेडकर पुरस्कार व डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय प्राविण्य पुरस्कार यांच्या नावाने पुरस्कार देवून पात्र व्यक्ती व संस्थांना सन्मानपुर्वक गौरविण्यात येते. याबाबतची पूर्ण माहिती असलेली जाहिरात महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत दि. 1 फेब्रुवारी 2025 रोजी वर्तमानपत्रात राज्यस्तरीय प्रसिध्द करण्यात आली आहे.
विहीत नमुन्यातील अर्ज सहायक आयुक्त, समाज कल्याण, कार्यालय कोल्हापूर या कार्यालयात विनामुल्य उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. अधिक माहितीसाठी समाज कल्याण कार्यालयाच्या दुरध्वनी क्र. 0231-2651318 या क्रमांकावर अथवा प्रत्यक्ष संपर्क साधावा, असेही श्री. साळे यांनी पत्रकाव्दारे कळविले आहे.