मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प सामान्य मुंबईकरांना दिलासा देणारा; ग्लोबल मुंबईचा शुभारंभ : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
schedule04 Feb 25 person by visibility 253 categoryराज्य
मुंबई : मुंबई महापालिकेने कोणतीही करवाढ, शुल्कवाढ, भुर्दंडवाढ नसलेला अर्थसंकल्प सादर केल्याने सामान्य मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे. सकारात्मक, विकासाभिमुख, विद्यार्थ्यांपासून ते चाकरमान्यांपर्यंत आणि गरीब कष्टकऱ्यांपासून ते उद्योजकांपर्यंत सर्व वर्गांच्या शिक्षण, आरोग्य, स्वच्छता आदी सुविधांचा विचार करणारा हा अर्थसंकल्प आधुनिक मुंबईचा शुभारंभ ठरेल, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
मंत्रालयात मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधताना उपमुख्यमंत्री शिदे बोलत होते. ते म्हणाले, मुंबई महापालिकेचा ७४ हजार ४२७ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर झाला. मुंबई वेगाने कात टाकत आहे. विकसित होत आहे. आम्ही दोन टप्प्यात मुंबईच्या रस्त्यांचे काँक्रिटीकरण केले. ग्लोबल मुंबईची चाहूल देणाऱ्या अर्थसंकल्पासाठी आयुक्त भूषण गगराणी आणि अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांचं उपमुख्यमंत्र्यांनी अभिनंदन केले.
भविष्यासाठी मुंबई वेगाने कात टाकतेय हे या अर्थसंकल्पातून स्पष्ट होईल, असे सांगत उपमुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, अर्थसंकल्पात ४३ हजार कोटी विकासकामांवर खर्च होणार आहेत. त्यावरुन मुंबईचा विकास राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने किती गांभीर्याने घेतला आहे, हे दिसून येते. भांडवली खर्चातली ही वाढ विक्रमी असून येत्या आर्थिक वर्षात महापालिकेच्या उत्पन्नात सात हजार कोटींनी भर पडली आहे त्याबद्दल उपमुख्यमंत्र्यांनी प्रशासनाचे कौतुक केले.
‘बेस्ट’ साठी एक हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. मुंबईतल्या पर्यटनाला चालना देतानाच इथला प्रवास वेगवान करण्यावरही भर देण्यात आलेला आहे. प्रदुषणमुक्त, खड्डेमुक्त आणि भ्रष्टाचार मुक्त मुंबई हा दिलेला शब्द खरा करून दाखवत आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली ग्लोबल मुंबई ही देशाचं फिनटेक कॅपिटल म्हणून आकाराला येत आहे. जगाच्या नकाशावर मुंबई दिमाखाने तळपताना दिसेल त्याचाच हा शुभारंभ असल्याचेही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी सांगितले.