आधुनिक GIS तंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष अनुभव: शिवाजी विद्यापीठात पार पडली ArcGIS Pro कार्यशाळा
schedule05 Oct 26 person by visibility 149 categoryशैक्षणिक
कोल्हापूर : आधुनिक भू-स्थानिक तंत्रज्ञानाच्या विविध पैलूंचा प्रत्यक्ष अनुभव देणारी “One-Day Hands-on Workshop on ArcGIS Pro” ही एकदिवसीय कार्यशाळा ३ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ९.०० ते सायंकाळी ५.०० या वेळेत शिवाजी विद्यापीठाच्या भूगोल विभागात उत्साहात संपन्न झाली. ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही पद्धतीने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यशाळेत विविध महाविद्यालयांतील विद्यार्थी, संशोधक, शिक्षक तसेच माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील व्यावसायिकांनी सहभाग नोंदविला.
भौगोलिक माहितीचे विश्लेषण, दृश्यीकरण आणि विविध क्षेत्रांतील निर्णयप्रक्रियेसाठी GIS तंत्रज्ञानाचे महत्त्व वाढत आहे. या पार्श्वभूमीवर सहभागीांना ArcGIS Pro सॉफ्टवेअरची ओळख करून देणे, त्यातील विविध साधनांचा प्रत्यक्ष वापर समजावून देणे आणि आधुनिक GIS तंत्रज्ञानाच्या प्रगत क्षमतांचा परिचय करून देणे हा कार्यशाळेचा प्रमुख उद्देश होता. त्यामुळे कार्यशाळेची रचना प्रात्यक्षिक आणि प्रत्यक्ष प्रशिक्षणावर आधारित करण्यात आली.
कार्यशाळेच्या पहिल्या सत्रात “ArcGIS Pro सॉफ्टवेअरची ओळख” या विषयावर डॉ. पी. टी. पाटील यांनी मार्गदर्शन केले. ArcGIS Pro ची मूलभूत कार्यपद्धती, विविध साधने, नकाशा निर्मिती तसेच GIS आधारित कामाची सुरुवात याबाबत त्यांनी प्रात्यक्षिकांसह माहिती दिली. दुसऱ्या सत्रात “3D Visualization च्या क्षमता” या विषयावर डॉ. अभिजित पाटील यांनी मार्गदर्शन केले. भौगोलिक माहितीचे त्रिमितीय दृश्यीकरण, भूपृष्ठावरील उंचीतील बदलांचे आकलन तसेच विविध भौगोलिक घटकांचे प्रभावी सादरीकरण याबाबत त्यांनी प्रात्यक्षिके घेतली. दुपारनंतरच्या तिसऱ्या सत्रात “LiDAR Data वर आधारित भूपृष्ठ विश्लेषण” या विषयावर प्रा. (डॉ.) एस. एस. पन्हाळकर यांनी मार्गदर्शन केले. LiDAR Data च्या साहाय्याने भूपृष्ठाची रचना, उंचीतील बदल आणि भूपृष्ठाशी संबंधित विविध वैशिष्ट्यांचे विश्लेषण करण्याच्या पद्धती त्यांनी प्रत्यक्ष उदाहरणांच्या माध्यमातून स्पष्ट केल्या. कार्यशाळेच्या चौथ्या सत्रात “भौगोलिक आकलनासाठी Spatial Analysis” या विषयावर डॉ. सुधीर पवार यांनी मार्गदर्शन केले. विविध भौगोलिक घटकांच्या विश्लेषणासाठी Spatial Analysis चा वापर याबाबत त्यांनी प्रात्यक्षिकांसह माहिती दिली.
अशा प्रकारे कार्यशाळेची मांडणी ArcGIS Pro च्या मूलभूत ओळखीपासून 3D Visualization, LiDAR Data आणि Spatial Analysis या प्रगत तंत्रांपर्यंत क्रमशः करण्यात आली. त्यामुळे ऑनलाइन तसेच ऑफलाइन सहभागीांना GIS तंत्रज्ञानाच्या विविध पैलूंचा सलग आणि प्रत्यक्ष अनुभव घेता आला.
कार्यशाळेच्या समारोपप्रसंगी ओमकार देशपांडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी GIS आणि भू-स्थानिक तंत्रज्ञानातील व्यावसायिक संधी, उद्योग क्षेत्रातील त्याचा वाढता वापर आणि विद्यार्थ्यांनी कौशल्याधारित शिक्षणावर भर देण्याची गरज याबाबत मार्गदर्शन केले.
यानंतर भूगोल विभागाचे विभागप्रमुख प्रा. (डॉ.) एस. एस. पन्हाळकर यांनी अध्यक्षीय भाषण केले. त्यांनी अशा प्रात्यक्षिकाधारित कार्यशाळांमधून विद्यार्थ्यांना आणि संशोधकांना मिळणाऱ्या व्यावहारिक ज्ञानाचे महत्त्व तसेच शैक्षणिक व संशोधन क्षेत्रात GIS तंत्रज्ञानाच्या प्रभावी वापराची गरज अधोरेखित केली.
यावेळी सहभागीांनी कार्यशाळेबाबत आपले अनुभव व अभिप्राय व्यक्त केले. प्रात्यक्षिकाधारित प्रशिक्षणामुळे ArcGIS Pro मधील विविध साधने प्रत्यक्ष समजून घेण्याची संधी मिळाल्याचे सहभागींनी सांगितले. विशेषतः 3D Visualization, LiDAR Data आणि Spatial Analysis यांचा प्रत्यक्ष वापर समजल्याने कार्यशाळा शैक्षणिक, संशोधनात्मक आणि व्यावसायिकदृष्ट्या उपयुक्त ठरल्याचे त्यांनी नमूद केले. समारोपप्रसंगी सहभागींना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. विविध महाविद्यालये, संशोधन क्षेत्र आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील सहभागींच्या उपस्थितीमुळे कार्यशाळेला व्यापक स्वरूप प्राप्त झाले.
कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनासाठी संशोधक शुभम गिरिगोसावी, शिक्षकेतर कर्मचारी तसेच एम.एस्सी. द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी विशेष सहकार्य केले. कार्यशाळेच्या संपूर्ण आयोजनासाठी विभागप्रमुख प्रा. (डॉ.) एस. एस. पन्हाळकर यांचे मार्गदर्शन लाभले.
तज्ज्ञांचे मार्गदर्शन, प्रात्यक्षिक प्रशिक्षण आणि आधुनिक GIS तंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष अनुभव यांचा प्रभावी संगम असलेली ही कार्यशाळा सहभागीांसाठी ज्ञानवर्धक ठरली. शैक्षणिक, संशोधनात्मक आणि व्यावसायिक क्षेत्रात GIS तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्यासाठी या कार्यशाळेने सहभागीांना उपयुक्त दिशा दिली. कार्यशाळेच्या समारोपप्रसंगी डॉ. अभिजित पाटील यांनी आभार मानले.