EMSA INSPIRE 2026 : महाराष्ट्र राज्यस्तरीय शिक्षक सन्मान व पुरस्कार सोहळा २४ सप्टेंबर रोजी
schedule21 Sep 26 person by visibility 147 categoryशैक्षणिक
कोल्हापूर : महाराष्ट्रातील शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय, प्रेरणादायी आणि नाविन्यपूर्ण कार्य करणाऱ्या शिक्षक व मुख्याध्यापकांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी इंग्लिश मीडियम स्कूल असोसिएशन (EMSA) यांच्या वतीने “EMSA INSPIRE 2026 – Maharashtra State-Level Celebration of Educational Excellence” या राज्यस्तरीय शिक्षक सन्मान व पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवार, दि. २४ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी ४ वाजता हॉटेल सयाजी, कोल्हापूर येथे हा सोहळा संपन्न होणार असल्याची माहिती EMSA चे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष के. डी. पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या सोहळ्यास चंद्रकांतदादा पाटील, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा संसदीय कार्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. तसेच प्रकाश आबिटकर, सार्वजनिक आरोग्य मंत्री तथा पालकमंत्री, कोल्हापूर जिल्हा, हसन मुश्रीफ, वैद्यकीय शिक्षण मंत्री, महाराष्ट्र राज्य, यांच्यासह कोल्हापूर जिल्ह्यातील विविध मान्यवर मंत्री, खासदार, आमदार तसेच शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे.
EMSA INSPIRE 2026 साठी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधून शिक्षक व मुख्याध्यापकांनी मोठ्या संख्येने नामनिर्देशन दाखल केले. प्राप्त नामनिर्देशनांची छाननी व मूल्यांकन प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने राबविण्यात आली असून, विविध निर्धारित निकषांच्या आधारे निवडक शिक्षक व मुख्याध्यापकांची अंतिम निवड करण्यात आली आहे.
शिक्षकांच्या गुणवत्तापूर्ण कार्याची समाजाने दखल घ्यावी, त्यांच्या योगदानाला योग्य व्यासपीठ मिळावे आणि शिक्षण क्षेत्रातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्तींना प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने EMSA INSPIRE 2026 चे आयोजन करण्यात आले आहे. हा सोहळा केवळ पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम नसून, महाराष्ट्राच्या शिक्षण क्षेत्रातील उत्कृष्टता, नवोपक्रम आणि समर्पणाचा उत्सव म्हणून आयोजित करण्यात येत असल्याचे के. डी. पाटील यांनी सांगितले.
या कार्यक्रमास EMSA चे संस्थापक अध्यक्ष महेश पोळ, राज्याध्यक्ष गणेश नायकुडे, उपाध्यक्ष श्री. जाधव, सचिव नितीन पाटील, सहसचिव विल्सन वास्कर, कोल्हापूर शहर अध्यक्ष अमर सरनाईक, क्रीडा प्रमुख सचिन नाईक, राधानगरी तालुका प्रमुख रणदिवे तसेच असोसिएशनचे विविध पदाधिकारी उपस्थित होते.