कामे न करणाऱ्या ठेकेदारांना ब्लॅकलिस्ट करा : आयुक्त डॉ.राजेंद्र भारूड यांचे निर्देश
schedule23 Nov 26 person by visibility 138 categoryमहानगरपालिका
◼️नोव्हेंबरअखेर रस्त्यांची कामे सुरू न केल्यास कारवाई; नगररचना विभागाला १५० कोटींच्या वसुलीचे उद्दिष्ट
कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेच्या विविध विभागांच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड यांनी आज आयुक्त कार्यालयातील बैठक हॉलमध्ये सर्व खातेप्रमुखांची आढावा बैठक घेतली. यावेळी घरफाळा, पाणीपट्टी वसुली, अनधिकृत बांधकामे, रस्त्यांची कामे, अमृत योजना, फेरीवाले, नगररचना विभागाची वसुली तसेच विविध प्रशासकीय कामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
शहरातील रस्त्यांची कामे ठराविकच ठेकेदार करत असून इतर ठेकेदार कामे करण्यास टाळाटाळ करत असल्याचे निदर्शनास आल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करा. नोव्हेंबरअखेर ज्या ठेकेदारांनी कामे सुरू केलेली नसतील, त्यांना ब्लॅकलिस्ट करण्याची प्रक्रिया सुरू करा असे निर्देश आयुक्तांनी दिले. यासाठी शहर अभियंत्यांनी बुधवारी सर्व ठेकेदारांची बैठक घेऊन कामांचा आढावा घेण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
महापालिका कर्मचाऱ्यांचे एनपीएस, पदोन्नती, लाड-पागे समिती नियुक्ती आणि पदभरतीसंदर्भातील प्रलंबित कामे तातडीने मार्गी लावावीत. पदभरतीसाठी शासनाने निश्चित केलेल्या टीसीएस कंपनीची वर्कऑर्डर तयार करण्याची प्रक्रिया पूर्ण करावी. नवीन नियुक्त्यांसाठी साधारणतः तीन महिन्यांचा कालावधी लागणार असल्याने याबाबतची कार्यवाही वेळेत पूर्ण करावी अशा सूचना कामगार अधिका-यांना दिल्या.
अमृत योजनेअंतर्गत सुरू असलेल्या कामांपैकी किती कामे प्रलंबित आहेत आणि किती प्रगतिपथावर आहेत, याची माहिती घेऊन कामांना गती द्यावी. नवीन पाईपलाइन टाकलेल्या ठिकाणी जुन्या पाईपलाइन टप्प्याटप्प्याने बंद करण्याचे नियोजन करावे. दुष्काळाच्या संभाव्य परिस्थितीचा विचार करून शहरातील जुन्या विहिरींचे पुनरुज्जीवन करावे. मे महिन्यात आवश्यकता भासल्यास या विहिरींचा वापर करता येईल यासाठी डीपीडीसीमध्ये प्रस्ताव सादर करावा अशा सूचना जल अभियंत्यांना दिल्या. तसेच शहरातील पाणीपुरवठा व ड्रेनेज लाइनचे डिजिटल मॅपिंग करून त्याची प्रत कायमस्वरूपी जतन करण्यासाठी पाणीपुरवठा विभागाकडे ठेवावी असेही त्यांनी सांगितले.
इस्टेट विभागाने शहरातील फेरीवाल्यांना क्यूआर कोड देण्याची प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी. फेरीवाल्यांनी हे क्यूआर कोड त्यांच्या हातगाड्यांच्या दर्शनी भागात लावणे बंधनकारक असून गाडी बंद असतानाही ते स्पष्टपणे दिसले पाहिजेत. जेणेकरून तपासणीवेळी त्यांचे स्कॅनिंग करता येईल. क्यूआर कोड नसलेल्या फेरीवाल्यांवर कारवाई करण्यासाठी आवश्यक नियोजन करावे. यापूर्वी सर्व पात्र फेरीवाल्यांना क्यूआर कोड देण्याची प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश उप-आयुक्तांना दिले.
नगररचना विभागाच्या वसुलीत अपेक्षित वाढ होत नसल्याने विशेष कॅम्प आयोजित करून बांधकाम परवानग्या द्याव्यात. गुंठेवारीची प्रकरणे नियमित करून वसुली वाढवावी. या विभागाला आवश्यक कर्मचारी आणि उपद्रव शोध पथक उपलब्ध करून दिले असल्याने शहरातील बंदिस्त पार्किंगचा गैरवापर आणि अनधिकृत बांधकामांवर कठोर कारवाई करावी.
नगररचना विभागाने ३१ मार्च २०२७ पर्यंत १५० कोटी रुपयांच्या वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करावे असे स्पष्ट निर्देश आयुक्तांनी दिले. क्रिडाईच्या माध्यमातून शहरातील सर्व बांधकाम व्यावसायिकांना सांडपाणी प्रक्रिया केंद्रातून प्रक्रिया केलेले पाणी बांधकामासाठी वापरणे बंधनकारक करण्याबाबत क्रिडाईच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक आयोजित करावी.
शहरातील ज्या मालमत्तांना अद्याप घरफाळा आकारणी झालेली नाही किंवा ज्या मालमत्तांमध्ये वाढीव बांधकाम झाले आहे अशा ठिकाणी नियमानुसार दंडासह घरफाळा आकारणी करावी. मागील वर्षाच्या तुलनेत चालू वर्षात प्रत्येक महिन्याला वसुलीमध्ये वाढ दिसली पाहिजे असे निर्देश वसुली विभागाला देण्यात आले.
सार्वजनिक बांधकाम विभागातील निविदा प्रक्रिया, मंजूर व प्रलंबित कामे तसेच नगरोत्थान योजनेतील कामांचा अतिरिक्त आयुक्त व शहर अभियंत्यांनी नियमित आढावा घ्यावा असेही निर्देश दिले. तसेच शहर अभियंता, जल अभियंता व उपआयुक्त यांनी महापालिका तसेच शासनाकडून मंजूर झालेल्या विविध प्रकल्पांना प्राधान्य देऊन ते लवकरात लवकर मार्गी लावावेत. सर्व कामे विहित मुदतीत पूर्ण होण्यासाठी बार चार्ट तयार करून त्यानुसार ठेकेदारांकडून कामे करून घ्यावीत. कामांच्या प्रगतीवर नियमित लक्ष ठेवून प्रकल्प वेळेत पूर्ण होतील याची दक्षता घ्यावी असे निर्देशही आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड यांनी यावेळी दिले.
यावेळी अतिरिक्त रविकांत आडसूळ, शिल्पा दरेकर, उप-आयुक्त परितोष कंकाळ, किरणकुमार धनवाडे, नागेंद्र मुतकेकर, सहाय्यक आयुक्त उज्वला शिंदे, डॉ.विजय पाटील, संजय सरनाईक, राम काटकर, मुख्य लेखापरिक्षक कलावती मिसाळ, शहर अभियंता रमेश मस्कर, जल अभियंता जयेश जाधव, नगरसचिव दिवाकर कारंडे, उपशहर रचनाकर महादेव फुलारी, पदमल पाटील, उपशहर अभियंता सुरेश पाटील, निवास पोवार, अरुणकुमार गवळी, मिलिंद जाधव, करनिर्धारक व संग्राहक सुधाकर चल्लावाड, विधी अधिकारी संदीप तायडे, मुख्य आरोग्य निरिक्षक जयवंत पवार, पर्यावरण अधिकारी समीर व्याघ्रांबरे, मुख्य अग्निशमन अधिकारी मनीष रणभिसे, अंतर्गत लेखापरिक्षक प्रशांत पंडत, वर्कशॉप प्रमुख संजय भोसले, विद्युत अभियंता नारायण पुजारी, सिस्टीम मॅनेजर यशपालसिंह रजपूत, इस्टेट ऑफिसर शेखर साळोखे, अतिक्रमण प्रमुख प्रफुल्ल कांबळे आदी उपस्थित होते.