चंद्रकांत चषक फुटबॉल स्पर्धेचे बुधवारपासून आयोजन : उद्योजक सत्यजित जाधव व राजेंद्र कुरणे यांची माहिती
schedule31 Mar 25 person by visibility 449 categoryक्रीडा

▪️विजेत्या संघाला २ लाख ३१ हजार रुपये, तर उपविजेत्या संघाला १ लाख ३१ हजार रुपये आणि चंद्रकांत चषकाचे बक्षीस : चालू वर्षातील सर्वाधिक बक्षिसाची मोठी स्पर्धा
कोल्हापूर : बालगोपाल तालीम मंडळ आयोजित "चंद्रकांत चषक -२०२५" फुटबॉल स्पर्धेला बुधवारी दि. २ एप्रिल २०२५ पासून शाहू स्टेडियम येथे सुरुवात होत आहे. या स्पर्धेतील विजेत्या संघाला २ लाख ३१ हजार रुपये आणि चंद्रकांत चषक, उपविजेत्या संघाला १ लाख ३१ हजार रुपये आणि चंद्रकांत चषक, तसेच स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना वैयक्तिक बक्षिसे देण्यात येणार असल्याची माहिती युवा उद्योजक सत्यजित चंद्रकांत जाधव व राजेंद्र कुरणे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
बालगोपाल तालीम मंडळाच्या वतीन २ एप्रिल ते १३ एप्रिल या कालावधीत स्पर्धा होणार आहे. स्पर्धेचे उद्घाटन राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष, आमदार राजेश क्षीरसागर, माजी आमदार व विफाचे उपाध्यक्ष मालोजीराजे छत्रपती, माजी खासदार संजय मंडलिक, माजी आमदार व शिवसेनेच्या उपनेत्या जयश्री जाधव, शिवसेनेचे समन्वयक सत्यजित कदम, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण यांच्या हस्ते बुधवारी दुपारी साडेतीन वाजता होणार आहे. उद्घाटनाचा सामना वेताळमाळ तालीम मंडळ व उत्तरेश्वर प्रसादिक वाघाची तालीम मंडळ यांच्यात होणार आहे.
तर स्पर्धेतील पहिला सामना पाटाकडील तालीम मंडळ (अ) व रंकाळा तालीम मंडळ यांच्यात सकाळी आठ वाजता होणार आहे.
स्पर्धेच्या निमित्ताने मैदानावर दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव (आण्णा) यांचे भव्य पोस्टर उभारण्यात येणार आहे. तसेच शहराच्या विविध भागात मोक्याच्या ठिकाणी वरिष्ठ 16 संघातील खेळाडूंची प्रतिमा असणारे बॅनर लावण्यात येणार आहेत.
स्पर्धेतील उत्कृष्ट गोलकीपर, उत्कृष्ट डिफेन्स, उत्कृष्ट हाफ व उत्कृष्ट फॉरवर्ड या चार खेळाडूंना आकर्षक भेटवस्तू आणि गौरव चिन्ह, तर स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूला ३१ हजार रुपये, गौरव चिन्ह आणि भेटवस्तू देऊन गौरवले जाणार आहे. प्रत्येक सामन्यातील मॅन ऑफ द मॅचचा बहुमान मिळवणाऱ्या खेळाडूला आकर्षक बक्षिस देण्यात येणार आहे.