100 कोटीतील रस्त्यांची कामे 31 डिसेंबरपर्यंत पूर्ण करा : आमदार राजेश क्षीरसागर; 16 पैकी 13 रस्त्यांची कामे 80 ते 95 टक्के पूर्ण
schedule01 Dec 25 person by visibility 57 categoryमहानगरपालिका
कोल्हापूर : महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान योजनेअंतर्गत करण्यात येत असलेल्या 16 रस्त्यांपैकी 13 रस्त्यांची कामे 80 ते 95 टक्क्यांपर्यंत पूर्ण झाली असून, उर्वरित रस्त्यांची कामे 31 डिसेंबर 2025 पूर्वी पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश आमदार तथा राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी आज दिले. नवीन वर्षामध्ये शहराचा रस्त्यांचा चेहरामोहरा पूर्णपणे बदललेला दिसला पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
महापालिकेत घेण्यात आलेल्या 100 कोटींच्या रस्ते विकासकामांबाबत तसेच शहरातील घनकचरा व्यवस्थापन , पाणी पुरवठा, आरोग्य,क्रीडांगण यासह मूलभूत सुविधा पूर्ण व्हाव्यात, या अनुषंगानं आज आमदार राजेश क्षीरसागर यांनी कोल्हापूर महापालिकेच्या आयुक्त कार्यालयात अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली.
या बैठकीस प्रशासक के. मंजूलक्ष्मी, अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ, उपायुक्त परितोष कंकाळ, शिल्पा दरेकर, किरण धनवाडे, शहर अभियंता रमेश मस्कर, जल अभियंता हर्षजीत घाटगे आदी अधिकारी उपस्थित होते.
आमदार राजेश क्षीरसागर म्हणाले, रस्ते व पॅचवर्क कामांमध्ये कोणताही दर्जात्मक तडजोड चालणार नाही. वॉरंटी कालावधी 5 वर्ष करता येईल का, याची तपासणी करावी. शासननिधी व आमदार निधीतून मंजूर झालेल्या रस्त्यांसाठी निविदा प्रक्रिया त्वरित पूर्ण करण्याचे आदेशही त्यांनी दिले. पोल शिफ्टमुळे प्रलंबित असणारी रस्त्यांची कामे तातडीने मार्गी लावावीत. जे चार रस्ते पोल शिफ्टीगसाठी थांबले आहेत त्या ठिकाणी संबंधीत ठेकेदारामार्फत पोल शिफ्ट करुन ते रस्ते तातडीने पुर्ण करावेत. शहरातील रस्त्यांबाबत नागरीकांच्या रोषाला आंम्हाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत सदरचे रस्ते लवकरात लवकर पुर्ण करण्यात यावेत. गांधी मैदानाचे काम पूर्णत्वास येत असून, या कामामुळे उकरलेल्या भागावरील रस्ता करण्यासाठी निधी उपलब्ध करून देऊ. दर्जेदार रस्ते न करणाऱ्या ठेकेदारांना ब्लॅकलिस्ट करा, असा स्पष्ट इशाराही त्यांनी अधिकाऱ्यांना दिला. बुधवार पेठ इथलं क्रीडांगण तसच लाईन बाजार इथल्या हॉकी स्टेडियमच्या कामाची पूर्तता करावी, असं त्यांनी स्पष्ट केलं. शहरातील नागरिकांना पाणीपुरवठा, आरोग्य, घनकचरा व्यवस्थापन यासह सर्व मूलभूत सुविधा तातडीनं पुरवाव्यात अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
▪️16 रस्त्यांपैकी 13 रस्त्यांची प्रगती
• दसरा चौक – बिंदू चौक – मिरजकर तिकटी – नंगीवली चौक – संभाजीनगर : 3 किमी पैकी 2,800 मी. काम पूर्ण; उर्वरित 200 मी. ड्रेनेज लाइनमुळे प्रलंबित, 15 दिवसांत काम पूर्ण होणार.
• निर्मिती कॉर्नर – कळंबा जेल : 85% काम पूर्ण.
• लक्षतीर्थ वसाहत; खरी कॉर्नर – उभा मारुती चौक; लठ्ठे चौक – संगवी बंगला; ॲपल हॉस्पिटल – जिल्हा परिषद कंपाऊंड : 95% काम पूर्ण.
• विश्वेश्वरैया हॉल – चंदवाणी हॉल : 90% काम पूर्ण.
• सुभाष रोड – भोसले हॉस्पिटल; वृषाली चौक – पर्ल हॉटेल; लक्ष्मीपुरी जैन मंदिर – पान लाईन – धान्य लाईन : 85% काम पूर्ण.
• माऊली चौक – गोखले कॉलेज रोड; शाहू सेना चौक – झूम प्रकल्प : 75% काम पूर्ण.
• निर्माण चौक – जरगनगर रोड : 30% काम पूर्ण. : जमीन अधिग्रहणामुळे काम संथ.
• गगाई लॉन – राधानगरी रोड; रसिका हॉटेल – जाधववाडी रोड : जमीन अधिग्रहणामुळे काम संथ.
या बैठकीस उपशहर अभियंता महादेव फुलारी, सुरेश पाटील, निवास पवार, अरुण गुजर, सल्लागार संदीप गुरव तसेच ठेकेदार एव्हरेस्ट इन्फ्रा कंपनीचे प्रतिनिधी सत्तार मुल्ला उपस्थित होते.