एमसीए अध्यक्ष अजिंक्य नाईक यांचे आमदार ऋतुराज पाटील यांच्याकडून अभिनंदन; मित्रासाठी लावल्या जोडण्या
schedule24 Jul 24 person by visibility 364 categoryक्रीडा
कोल्हापूर : मुंबई क्रिकेट असोसिएशन (एम.सी.ए) नवनिर्वाचित अध्यक्ष अजिंक्य नाईक यांचे आमदार ऋतुराज पाटील यांनी अभिनंदन केले . संघटनकौशल्य आणि क्लब क्रिकेटचा अभ्यास असणाऱ्या अजिंक्य यांच्या नेतृत्वाखाली मुंबई क्रिकेट नव्या उंचीवर पोहोचेल, असा विश्वास आमदार पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.
अजिंक्य नाईक हे आमदार ऋतुराज पाटील यांचे अतिशय जवळचे मित्र आहेत. या दोघांनी अमेरिकेतील लिहाय युनिव्हर्सिटी एकत्र ग्लोबल विलेज कोर्स हे उच्च शिक्षण घेतले आहे.
उत्तम संघटक, शांत स्वभावाचे विद्यमान सेक्रेटरी अजिंक्य यांनी या निवडणुकीसाठी जोरदार तयारी केली होती.आमदार ऋतुराज पाटील गेल्या अनेक दिवसापासून आपल्या मित्राच्या निवडणूक यंत्रणेत सक्रिय होते. गेले दोन दिवस मुंबईत तळ ठोकून आमदार पाटील यांनी अजिंक्य यांच्यासाठी जोडण्या लावल्या . अजिंक्य यांचे मित्र आणि हितचिंतक या सर्वांच्या संघटित प्रयत्नांना यश आले आहे.
अजिंक्य नाईक यांच्या रूपाने एमसीएला तरुण, उत्साही नेतृत्व लाभले आहे. मुंबई क्रिकेटला ते नक्कीच एका नव्या उंचीवर नेतील. रणजी आणि भारतीय संघासाठी उत्तम खेळाडू घडविण्यासाठी अजिंक्य यांचे मोठे योगदान राहील, असा विश्वास आमदार ऋतुराज पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.
अजिंक्य नाईक हे एमसीए सचिव म्हणून कार्यरत होते. एमसीए अध्यक्ष अमोल काळे यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत अजिंक्य यांनी संजय नाईक यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव करत ही निवडणुक जिंकली. सर्वात कमी वयात अध्यक्षपदाचा मान मिळवला आहे.