'बांधावरची झाडे’ निसर्गाकडे पाहण्याचा सद्भाव निर्माण करणारे: डॉ. नंदकुमार मोरे; डॉ. व्ही.एन. शिंदे यांच्या पुस्तकाचे विद्यापीठात प्रकाशन
schedule20 Dec 24 person by visibility 211 categoryसामाजिक
कोल्हापूर : डॉ. व्ही.एन. शिंदे यांचे ‘बांधावरची झाडे’ हे पुस्तक निसर्गाकडे पाहण्याचा सद्भाव निर्माण करणारे आहे, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाच्या मराठी अधिविभागाचे प्रमुख डॉ. नंदकुमार मोरे यांनी आज येथे काढले.
शिवाजी विद्यापीठाचे कुलसचिव तथा विज्ञान लेखक डॉ. व्ही.एन. शिंदे यांच्या ‘बांधावरची झाडे’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा विद्यापीठाच्या मराठी व इंग्रजी अधिविभागाच्या वतीने आज सायंकाळी व्यवस्थापन परिषद सभागृहात आयोजित करण्यात आला. पुस्तकाचे प्रकाशन कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी पुस्तकाविषयी भाष्य करताना डॉ. मोरे बोलत होते. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील प्रमुख उपस्थित होते.
डॉ. मोरे म्हणाले, डॉ. शिंदे यांचे हे पुस्तक निसर्गाकडे पाहण्याची नवी दृष्टी प्रदान करणारे आहे. त्याचप्रमाणे यामध्ये निसर्ग, परिसर विज्ञान, साहित्य, इतिहास, पुराण, मिथके, मानववंशशास्त्र, लोकसाहित्य, भूगोल, वैद्यक, संज्ञाशास्त्र, कृषी, संस्कृती, अन्नसंस्कृती इत्यादी अनेकविध विषयांचा समावेश असल्याने ते मराठी भाषेची साहित्यिक परिभाषा देखील वृद्धिंगत करणारे आहे. कोणा एकाच विषयाच्या साच्यात त्याला बसविणे गैर ठरेल. या पुस्तकाचा लेखक आणि हे पुस्तक या दोहो बाबी शिवाजी विद्यापीठाच्या परिसरात घडलेल्या असल्याने त्याविषयीही एक वेगळा अभिमान वाटतो, असे गौरवोद्गारही त्यांनी काढले.
प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील म्हणाले, डॉ. व्ही.एन. शिंदे हे कवीमनाचे भौतिकशास्त्रज्ञ आहेत, हे या पुस्तकाच्या वाचनातून लक्षात येते. कामाचा प्रचंड व्याप असतानाही एकाग्रता, अनेकाग्रता आणि समग्रता या त्रयींच्या संगमातूनच अशा प्रकारची साहित्यिक नवनिर्मिती करणे त्यांना शक्य झाले असावे, असेही ते म्हणाले.
यावेळी आपल्या मनोगतात पुस्तकाची निर्मितीप्रक्रिया डॉ. व्ही.एन. शिंदे यांनी विषद केली. ते म्हणाले, कवीवर्य वसंत आबाजी डहाके यांच्या ‘झाड’ या कवितेमुळे झाडे वाचण्याची प्रेरणा मिळाली आणि ज्येष्ठ साहित्यिक डॉ. राजन गवस यांचे लिहीण्यासाठी प्रोत्साहन लाभले. त्यातून सर्वसामान्य पण राज्याच्या कानाकोपऱ्यात शेताच्या बांधावर आढळणाऱ्या झाडांवर लिहावेसे वाटले. त्यातून हे पुस्तक साकारले.
अध्यक्षीय मनोगतात कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले, डॉ. शिंदे हे पर्यावरणाच्या सान्निध्यात रमणारे असल्याने त्या सान्निध्यातूनच त्यांच्या साहित्यनिर्मितीला चालना मिळाली आहे. ‘बांधावरची झाडे’ हे पुस्तक शेतकऱ्याशी वाचकाचे नाते अधिक दृढ करणारे आहे. विविध विद्याशाखांच्या मिलाफातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश त्यांनी यामध्ये दिला आहे. विज्ञान साहित्याच्या क्षेत्रात डॉ. शिंदे यांनी आता चांगला लौकिक प्राप्त केला आहे. यापुढील काळात अधिक जोमदारपणे त्यांची विज्ञान प्रबोधनाची वाटचाल होत राहावी आणि त्यांच्या हातून दर्जेदार साहित्यकृती निर्माण व्हाव्यात, अशा सदिच्छाही त्यांनी दिल्या.
यावेळी कुलगुरू डॉ. शिर्के यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. इंग्रजी अधिविभाग प्रमुख डॉ. प्रभंजन माने यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. डॉ. सुखदेव एकल यांनी सूत्रसंचालन केले, तर अमोल देशमुख यांनी आभार मानले. यावेळी वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखा अधिष्ठाता डॉ. श्रीकृष्ण महाजन, मानव्यशास्त्र विद्याशाखा अधिष्ठाता डॉ. महादेव देशमुख, डॉ. तृप्ती करेकट्टी, डॉ. चंद्रकांत लंगरे, डॉ. राजश्री बारवेकर, डॉ. मनोहर वासवानी, डॉ. शिवाजी जाधव, डॉ. विनोद कांबळे, डॉ. दीपक भादले यांच्यासह इंग्रजी व मराठी विभागाचे संशोधक, विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.