कोल्हापूर महानगरपालिका कारभारावर 'आप'चा संताप: नगरसेवकांकडे प्रशासनाला गतिमान करण्याचे कौशल्य नाही : अभिजीत कांबळे
schedule16 Nov 26 person by visibility 92 categoryमहानगरपालिका
कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेत सत्ताधारी आणि विरोधी नगरसेवकांकडून निधी मिळत नसल्याबाबत आणि विकासकामांकडे दुर्लक्ष होत असल्याबाबत प्रशासनावर जो संताप व्यक्त केला जात आहे, त्यावर आम आदमी पार्टीचे शहर महासचिव अभिजीत कांबळे यांनी तीव्र शब्दांत टीका केली आहे.
प्रशासनाला धारेवर धरणाऱ्या सत्ताधारी व विरोधकांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
फुलेवाडी रिंग रोड ते डीवायपी कॉलेज रस्ता प्रशासनाकडून केला जात नाही, असा आरोप करत सत्ताधाऱ्यांनी प्रशासनाचा निषेध केला होता. यावर प्रतिक्रिया देताना अभिजीत कांबळे म्हणाले की, केंद्रात आणि राज्यात सत्ता असून तसेच महानगरपालिकेतही सत्ता असताना जर नगरसेवकांना प्रशासन कसे चालवावे हे समजत नसेल, तर हे त्यांचे अपयश आहे. केवळ प्रशासनावर खापर फोडून सत्ताधारी आपली जबाबदारी झटकत असल्याचा आरोप त्यांनी केला. प्रशासनातील त्रुटी दूर करून त्याला गतिमान करण्याची मुख्य जबाबदारी सत्ताधाऱ्यांची असते, असेही त्यांनी स्पष्ट केले.
दुसरीकडे, विरोधी नगरसेवकांची देखील "आम्हाला बजेट आणि निधी मिळत नाही" अशी सतत ओरड सुरू असते. मात्र, महानगरपालिका सध्या आर्थिक अडचणीत असून तिचा स्वतःचा महसूल (Revenue) कसा वाढवावा, याबाबत कोणताही नगरसेवक अभ्यास करताना किंवा प्रयत्न करताना दिसत नाही, असा गंभीर आरोप कांबळे यांनी केला.
फक्त प्रशासनाला नावे ठेवणे आणि स्वतःची कामे होत नाहीत म्हणून आरडाओरडा करणे हे कोल्हापूरकरांचे दुर्दैव असल्याचे ते म्हणाले.
महानगरपालिका आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी नवीन धोरणे आणि उपायांवर चर्चा करण्याची गरज असताना नगरसेवकांकडून केवळ टोलवाटोलवी सुरू आहे. जोपर्यंत सक्षम नगरसेवक मिळत नाहीत, तोपर्यंत कोल्हापूर महानगरपालिका अविकसितच राहणार असून, हेच कोल्हापूरकरांचे खरे दुर्दैव असल्याचे सांगत आम आदमी पार्टीतर्फे या सर्व नगरसेवकांच्या भूमिकेचा निषेध करण्यात आला आहे.