रिंगरोडच्या दर्जेदार विकासासाठी दीड कोटींचा निधी लवकरच मिळणार: नगरसेवक अभिजित खतकर यांची माहिती
schedule16 Nov 26 person by visibility 109 categoryमहानगरपालिका
कोल्हापूर : प्रभाग क्रमांक २० मधील खराब रस्त्यांच्या समस्येबाबत आणि रिंगरोडच्या विकासाबाबत नगरसेवक अभिजित खतकर यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. डी. वाय. पाटील हायस्कूल, कॉलेज ते वाशी नाका, शिवाजी बाजार चौकापर्यंतच्या रस्त्यासाठी सुरुवातीला ५० लाख रुपये मंजूर झाले होते. मात्र, केवळ ५० लाखांच्या निधीत रस्ता पुन्हा खड्डेमय व अपुरा राहण्याची शक्यता असल्याने, हा टेंडर रद्द करून संपूर्ण रस्त्यासाठी तब्बल दीड कोटी रुपयांचा निधी मिळावा, अशी मागणी आयुक्तांकडे करण्यात आली आहे.
याबाबत बोलताना नगरसेवक खतकर म्हणाले की, नागरिकांच्या रोषाची आम्हाला जाणीव असून, प्रभागातील नागरिकांना व प्रवाशांना उत्तम आणि दर्जेदार रस्ता उपलब्ध करून देण्यासाठी आमचे सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. यासाठी आयुक्तांना पत्र देऊन ५० लाखांचे रिटेंडर करून एनकॅप (NCAP) मधून १ कोटी आणि आधीचे ५० लाख असा एकूण दीड कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्याची विनंती केली आहे.
वरिष्ठ नेत्यांच्या आणि महायुतीच्या माध्यमातून या कामासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू असून, आयुक्तांनी देखील लवकरात लवकर निधी मंजूर करून पुढील १५ दिवसांत त्याचे टेंडर काढण्याचे आश्वासन दिल्याची माहिती नगरसेवक अभिजित खतकर यांनी दिली आहे.