डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या संशोधकांचा राष्ट्रीय विज्ञान मंचामध्ये सहभाग
schedule18 Nov 25 person by visibility 61 categoryशैक्षणिक
कोल्हापूर : डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे संशोधन संचालक प्रा. डॉ. प्रमोद एस. पाटील आणि सहाय्यक प्राध्यापक डॉ. प्रविण पी. पवार यांची ‘इमर्जिंग सायन्स, टेक्नॉलॉजी अँड इनोव्हेशन कॉन्क्लेव्ह (ESTIC-2025)’ साठी अनुक्रमे वरिष्ठ विज्ञान व तंत्रज्ञान लीडर आणि युवा विज्ञान व तंत्रज्ञान लीडर म्हणून निवड झाली.
भारत सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभाग आणि प्रधान वैज्ञानिक सल्लागार कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने, तसेच १२ मंत्रालयांच्या सहकार्याने ही परिषद आयोजित करण्यात आली होती. नवी दिल्ली येथे भारत मंडपम येथे ३ ते ५ नोव्हेंबर २०२५ हि परिषद झाली.
विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रातील महत्त्वपूर्ण व उदयोन्मुख क्षेत्रे जाणून घेण्यासाठी हि परिषद आयोजित करण्यात आली. संपूर्ण भारतातून निवडलेले संशोधक, शैक्षणिक लीडर, उद्योगपती, निधी पुरवठा संस्था, धोरणकर्ते, स्टार्ट-अप्स आणि विद्यार्थी हे ‘विकसित भारत 2047’ या संकल्पनेशी संबंधित तंत्रज्ञान हस्तांतरण, सहकार्य, संधी, संशोधन सहकार्य इत्यादी विषयांवर चर्चा करण्यासाठी सहभागी झाले होते. यामध्ये डॉ. पाटील यांनी संशोधन विषयक विविध मुद्दे मांडले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, नोबेल विजेते भौतिकशास्त्रज्ञ प्रा. आंद्रे गाइम, विज्ञान व तंत्रज्ञान मंत्री डॉ. जितेंद्र सिंह, प्रधान वैज्ञानिक सल्लागार प्रा. अजयकुमार सूद, तसेच विज्ञान व तंत्रज्ञान विभागाचे वरिष्ठ अधिकारी, विविध विभागांचे प्रतिनिधी, नोबेल विजेते, जागतिक तज्ज्ञ, धोरणकर्ते, शैक्षणिक व वैज्ञानिक क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थित होते. या सत्रात ‘विकसित भारत २०४७’ या राष्ट्रीय विज्ञान-तंत्रज्ञान-नवोपक्रम दृष्टिकोनावर प्रकाश टाकण्यात आला.
प्रा. डॉ. पी. एस. पाटील यांची शैक्षणिक लीडर म्हणून निवड झाली, ही डी. वाय. पाटील विद्यापीठासाठी अत्यंत प्रतिष्ठेची बाब ठरली. कुलपती डॉ. संजय डी. पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, कुलगुरू डॉ. आर. के. शर्मा आणि कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले यांनी डॉ. पाटील व डॉ. पवार यांचे अभिनंदन केले आहे.