महानगरपालिकेच्या भाडेतत्त्वावरील डांबरी प्लॅंटमुळे गुणवत्ता वाढणार; डांबर खरेदी थेट हिंदूस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (HPCL) कंपनी कडून
schedule03 Dec 25 person by visibility 49 categoryमहानगरपालिका
कोल्हापूर : यावर्षीच्या अतिवृष्टीमुळे शहरातील अनेक रस्त्यांची मोठ्या प्रमाणात खराब झाल्याने खड्ड्यांचे प्रमाण वाढले आहे. सद्यस्थितीत नागरिकांना चांगले रस्ते मिळणेसाठी महानगरपालिकेतर्फे संपूर्ण शहरातील रस्त्यांची दुरुस्ती तसेच नवीन रस्त्यांची निर्मिती युद्धपातळीवर सुरू आहे.
महापालिकेने रस्ते दुरुस्तीच्या कामाचा वेग व गुणवत्ता वाढवण्यासाठी भाडेतत्त्वावर डांबरी प्लॅंट घेण्याचा निर्णय प्रशासक के. मंजूलक्ष्मी यांच्या मार्गदर्शनाखाली घेतला आहे. या प्लॅंटसाठी लागणारी आवश्यक खडी, डांबर तसेच तांत्रिक युनिटचे साधनसामग्री महापालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत भाडेतत्त्वावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. यासाठी अंदाजपत्रकानुसार 2861.49 ब्रास विविध प्रकारची खडी तसेच व्हीजी-30 प्रकारचे 89.41 मेट्रिक टन डांबर खरेदीस मान्यता देण्यात आली असून, यापैकी 14 MT डांबर हिंदूस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (HPCL) मार्फत खरेदी करून महापालिकेच्या स्वतःच्या बाऊजरद्वारे वाहतूक करण्यात आली आहे.
थेट हिंदूस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (HPCL) कंपनीकडून डांबर खरेदी केल्यामुळे डांबराची गुणवत्ता व त्याचा वापर योग्य तऱ्हेने केल्यामुळे रस्त्याची गुणवत्ता सुधारणार आहे. तसेच हिंदूस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (HPCL) ही कंपनी शासनाच्या नियंत्रणाखाली असल्यामुळे त्यांच्याकडून खरेदी करण्यात येणाऱ्या डांबराची गुणवत्ता किमतीनुसार चांगली असणार आहेत. यापूर्वी कंत्राटदारामार्फत होणाऱ्या डांबराच्या दर्जाबाबत खात्री देता येत नव्हती, त्यामुळे मनपाच्या डांबरी प्लांट च्या माध्यमातून गुणवत्तेवर नियंत्रण ठेवणे शक्य होणार आहे.
या कामांसाठी वार्षिक ठेकेदारांकडून खडी पुरवठा करण्यात येत आहे. सदर संपूर्ण कामासाठी रु. 2 कोटी खर्चास प्रशासकांनी मंजुरी दिली आहे. मागील चार दिवसांपासून महापालिकेच्या भाडेतत्त्वावरील प्लॅंटद्वारे रस्त्यांच्या पॅचवर्कची कामे सुरू आहेत. महापालिकेने प्रत्येक विभागीय कार्यालयास तीन दिवसांचे रोटेशन देऊन संपूर्ण शहरातील रस्त्यांचे पॅचवर्क नियोजनबद्ध पद्धतीने करण्याची रुपरेषा आखली आहे.
◼️यामध्ये विभागीय कार्यालय क्र. 4 अंतर्गत —
* दामिनी हॉटेल ते दाभोळकर कॉर्नर
* स्टँड परिसर
* रुबी अपार्टमेंट समोरील रस्ता
* धन्यप्रसाद हॉल ते जिल्हाधिकारी कार्यालय
◼️या ठिकाणी कामे करण्यात येत आहेत.
विभागीय कार्यालय क्र. 2 अंतर्गत —
* बिंदू चौक ते छ. शिवाजी चौक
* भवानी मंडप ते पुढारी कार्यालय
◼️या मार्गांवर आजपासून पॅचवर्क सुरू करण्यात आले आहे.
विभागीय कार्यालय क्र. 3 अंतर्गत —
उद्योग भवन ते ॲसेंबली रोड, एनसीसी भवन ते रेड्याची टक्कर, पानसरे स्मारक परिसर, बागल मार्केट ते रेल्वे फाटक, राजारामपुरी येथील अंतर्गत रस्ते — या मार्गांवर कामे होणार आहेत.
◼️विभागीय कार्यालय क्र. 1 अंतर्गत —
उभा मारुती चौक ते खंडोबा तालीम, तलवार चौक ते हरीओमनगर, दत्त मंगल कार्यालय, गंगाई लॉन ते शाहू चौक, देवकर पाणंद चौक ते पेट्रोल पंप, राजकपूर पुतळा ते क्रशर चौक, नाळे कॉलनी, ITI कॉर्नर ते वसंत विश्वास पार्क — या मार्गांवरील पॅचवर्कची कामे हाती घेण्यात येत आहेत.
चारही विभागीय कार्यालयांतर्गत सुरू असलेल्या या कामांमुळे रस्त्यांच्या गुणवत्तेत सुधारणा होत असल्याने नागरिकांच्यातून समाधान व्यक्त होत आहे. त्याचबरोबर पावसाळा संपल्यानंतर शहरातील रस्त्यांच्या तातडीच्या दुरुस्तीसाठी प्रशासकांनी पूर्वीच प्रत्येकी 50 लाख रुपये निधी विभागीय कार्यालयांना उपलब्ध करून दिला असून, त्याद्वारे ठेकेदारामार्फतही दुरुस्तीची कामे वेगाने सुरू आहेत.
ही सर्व कामे अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ व शहर अभियंता रमेश मस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली, उपशहर अभियंते महादेव फुलारी, सुरेश पाटील, अरुण गुजर व निवास पोवार यांच्या देखरेखी खाली करण्यात येत आहेत.