डॉ. बापूजी साळुंखे इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूटमध्ये विभागीय क्रीडा स्पर्धा उत्साहात
schedule24 Jan 25 person by visibility 334 categoryक्रीडा
कोल्हापूर : डिप्लोमा इंजीनिअरिंग क्षेत्रातील अत्यंत प्रतिष्ठेच्या विभागीय (झोनल) स्तरावरील बॅडमिंटन आणि टेबल टेनिस स्पर्धा श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या डॉ. बापूजी साळुंखे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीमध्ये स्पर्धात्मक वातावरणामध्ये दि. 20 व 21 जानेवारी रोजी संपन्न झाल्या. चित्तथरारक सामने , ऊर्जा आणि कौशल्याने स्पर्धा करणारे खेळाडू, उत्सुकता, खिलाडूवृत्तीचे प्रदर्शन अशा वैशिष्ट्यांनी गाजलेल्या या स्पर्धेत कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि सातारा जिल्ह्यातील 20 संघांनी सहभाग घेतला.
' इंटर इंजिनिअरिंग डिप्लोमा स्टुडंट्स स्पोर्ट्स असोसिएशन ' या शिखर संस्थेच्या बी -१ झोनमधील या स्पर्धा आयोजनाचा मान डॉ. बापूजी साळुंखे इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूटने प्राप्त केला. बॅडमिंटन स्पर्धेचे उद्घाटन श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे , विवेकानंद कॉलेजचे प्राचार्य डॉ. आर. आर. कुंभार यांच्या हस्ते झाले. टेबल टेनिस स्पर्धेचे उद्घाटन संस्थेच्या व्यावसायिक शिक्षण समूहाचे संचालक प्राचार्य विरेन भिर्डी, इन्स्टिट्यूटचे प्राचार्य डॉ. सुहास सपाटे यांच्या हस्ते झाले. उत्तम नियोजन ,अनुभवी पंच, सर्व सुविधायुक्त बॅडमिंटन कोर्ट आणि आधुनिक टेबल टेनिस सेटअप यांनी स्पर्धेमध्ये रंग भरला.
संस्थेच्या सचिवा प्रा. शुभांगी गावडे, संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडे यांनी यशस्वी खेळाडूंचे अभिनंदन केले. स्पर्धेच्या यशस्वी संचालनासाठी स्पर्धेचे व्यवस्थापक रजिस्ट्रार अमित आवाड इन्स्टिट्युटचे क्रीडाप्रमुख ऋषिकेश मेथे, समन्वयक प्रा. बी. बी. पाटील - नंद्याळकर, प्रा. साजिद नाईक यांनी परिश्रम घेतले.
🔴 स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे:
▪️बॅडमिंटन: विजेता - डॉ. डी. वाय. पाटील पॉलिटेक्निक, कोल्हापूर
▪️उपविजेता : यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, सावंतवाडी
▪️टेबल टेनिस: विजेता - डॉ बापूजी साळुंखे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, कोल्हापूर
▪️उपविजेता : शरद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, यड्राव