विधान परिषदेच्या पदवीधर-शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर!
schedule13 Oct 26 person by visibility 133 categoryराजकीय
◼️नागपूरमधील नाराजी दूर केल्यानंतर आता पुणे विभागातील निवडणूक तयारीवर लक्ष; डॉ. स्मिता जाधव आणि कौस्तुभ गावडे यांच्या प्रचाराला मिळणार बळ
पुणे : महाराष्ट्र विधान परिषदेच्या पुणे विभाग पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बुधवार, दि. १४ ऑक्टोबर रोजी पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत आहेत. नागपूर पदवीधर मतदारसंघातील पक्षांतर्गत नाराजी दूर करण्यासाठी झालेल्या चर्चांनंतर आता मुख्यमंत्री पुणे विभागातील निवडणूक तयारीकडे लक्ष केंद्रित करणार असल्याचे राजकीय घडामोडींवरून स्पष्ट होत आहे.
पुणे पदवीधर मतदारसंघासाठी डॉ. स्मिता योगेश जाधव, तर पुणे शिक्षक मतदारसंघासाठी कौस्तुभ गावडे हे भाजप महायुतीचे अधिकृत उमेदवार आहेत. या दोन्ही उमेदवारांच्या प्रचारासाठी प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण, मंत्री चंद्रकांत पाटील, प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे यांनी पुणे शहर, पुणे ग्रामीण, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यांतील पक्षाच्या कोअर कमिटीच्या बैठका घेऊन संघटनात्मक तयारीचा आढावा घेतला आहे.
डॉ. स्मिता जाधव यांच्याविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वी विश्वास व्यक्त करताना, “मला निश्चित विश्वास आहे की, त्यांना लोकं निवडून देतील,” अशी प्रतिक्रिया दिली होती. कौस्तुभ गावडे यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील कार्याचाही त्यांनी उल्लेख केला होता.
दरम्यान, पश्चिम महाराष्ट्रातील काही विधानसभा मतदारसंघांसाठी भाजपने प्रभारी नियुक्त करून निवडणुकीच्या नियोजनाला गती दिली आहे. मतदार नोंदणी, शिक्षक व पदवीधरांशी संपर्क, स्थानिक प्रश्न आणि विधानसभा मतदारसंघनिहाय समन्वय यावर पक्षाचा भर आहे.
मुख्यमंत्र्यांच्या प्रस्तावित दौऱ्यामुळे पुणे विभागातील निवडणूक तयारी, उमेदवारांचा प्रचार आणि पदाधिकाऱ्यांमधील समन्वय यांना अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे या दौऱ्यात मुख्यमंत्री कोणत्या बैठका घेतात आणि निवडणुकीच्या दृष्टीने कोणती दिशा देतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
◼️"मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजपा-महायुतीचे सरकार अनेक योजना व उपक्रमांच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या शिक्षण क्षेत्राला नव्या उंचीवर घेऊन जाण्यासाठी कटिबद्ध आहे, हे शिक्षक व पदवीधर मतदारांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना सांगण्यात येत आहे."
- रविंद्र चव्हाण
प्रदेशाध्यक्ष, भाजपा महाराष्ट्र