डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयात शनिवारी ‘टेकस्प्रिंट : डायमेन्शन एक्स’ हॅकेथॉनचे आयोजन
schedule15 Jan 26 person by visibility 72 categoryशैक्षणिक
कोल्हापूर : डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय येथे गूगल डेव्हलपर ग्रुप ऑन कॅम्पस - डीवायपीसीईटी आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स व मशीन लर्निंग विभागाच्या सहकार्याने ‘टेकस्प्रिंट: डायमेन्शन एक्स’ या नाविन्यपूर्ण हॅकेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे. हे हॅकाथॉन १६ व १७ जानेवारी रोजी होणार असून विद्यार्थ्यांमध्ये सर्जनशील विचारसरणी, तांत्रिक कौशल्ये आणि प्रत्यक्ष समस्या सोडवण्याची क्षमता विकसित करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
‘टेकस्प्रिंट : डायमेन्शन एक्स’ हा ओपन इनोव्हेशन संकल्पनेवर आधारित हॅकेथॉन असून, यात सहभागी विद्यार्थी गुगलच्या तंत्रज्ञानाचा वापर करून सामाजिक, तांत्रिक तसेच औद्योगिक समस्यांवर उपाय सुचवणारे प्रकल्प विकसित करणार आहेत.
हॅकेथॉनची पहिली फेरी ‘हॅक टू स्किल’ या अधिकृत ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर प्रकल्प सादरीकरणाच्या स्वरूपात पार पडणार असून, त्यातून निवडलेल्या संघांसाठी दुसरी फेरी २४ तासांची ऑफलाईन हॅकाथॉन म्हणून महाविद्यालयात आयोजित करण्यात येणार आहे. या हॅकेथॉनसाठी देशभरातून ८०० पेक्षा अधिक नोंदणी अर्ज प्राप्त झाले असून, त्यामधून २० ते २२ संघ अंतिम फेरीसाठी पात्र ठरणार आहेत. अंतिम फेरीत सहभागी संघांना सलग २४ तास प्रकल्प विकास, सादरीकरण तसेच तज्ज्ञ परीक्षकांकडून मूल्यांकनाची संधी मिळणार आहे. विजेत्यांना ३० हजार रुपयांचे पारितोषिक, प्रमाणपत्रे आणि विविध सन्मान प्रदान करण्यात येणार आहेत.
हॅकेथॉनचे नेतृत्व गूगल डेव्हलपर ग्रुप ऑन कॅम्पस - डीवायपीसीईटीचे लीड आयुष वसवाडे करत आहेत. इच्छुक विद्यार्थ्यांनी अधिक माहितीसाठी अधिकृत संकेतस्थळ किंवा आयोजकांशी संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, पृथ्वीराज पाटील, कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता, प्राचार्य डॉ. एस. डी. चेडे, रजिस्ट्रार डॉ. एल. व्ही. मालदे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स व मशीन लर्निंग विभागप्रमुख व कार्यक्रम समन्वयक डॉ. एस. व्ही. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवला जात आहे.