राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांची निवडणूक जाहीर
schedule14 Jan 26 person by visibility 69 categoryराज्य
▪️५ फेब्रुवारीला मतदान; ७ फेब्रुवारीला मतमोजणी - राज्य निवडणूक आयुक्त
मुंबई : राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि त्या अंतर्गतच्या 125 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 5 फेब्रुवारी 2026 रोजी मतदान; तर 7 फेब्रुवारी 2026 रोजी मतमोजणी होईल. जिल्हा परिषदांच्या एकूण 731; तर पंचायत समित्यांच्या 1 हजार 462 जागांसाठी ही निवडणूक होत आहे. या सर्व जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या क्षेत्रांत आचारसंहिता लागू झाली आहे, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी पत्रकार परिषदेत केली.
येथील सह्याद्री अतिथिगृहात जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांच्या कार्यक्रमाची घोषणा करण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत राज्य निवडणूक आयुक्त वाघमारे बोलत होते. आयोगाचे सचिव सुरेश काकाणी यावेळी उपस्थित होते. राज्य निवडणूक आयुक्त वाघमारे यांनी सांगितले की, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव आणि लातूर या 12 जिल्हा परिषदा आणि त्यांतर्गतच्या 125 पंचायत समित्यांसाठी ही निवडणूक होत आहे.
या निवडणुकीची सूचना 16 जानेवारी 2026 रोजी प्रसिद्ध होईल. सूचना प्रसिद्ध करण्याची प्रक्रिया संबंधित जिल्हाधिकारी आपापल्या स्तरावर पार पाडतील. मतदान 5 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत होईल.