सेवा संकल्प इनोव्हेशन चॅलेंज अंतर्गत जिल्हास्तरीय सादरीकरण स्पर्धा उत्साहात
schedule12 Nov 26 person by visibility 93 categoryराज्य
▪️शिवाजी विद्यापीठात १३० स्पर्धकांचा सहभाग; १११ स्पर्धकांनी ऑनलाइन प्रात्यक्षिके सादर केली
कोल्हापूर : राज्यातील नाविन्यपूर्ण संकल्पनांना प्रोत्साहन देण्यासाठी शासनाच्या सेवा संकल्प अभियानांतर्गत महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीमार्फत राबविण्यात येत असलेल्या ‘सेवा संकल्प इनोव्हेशन चॅलेंज’ उपक्रमांतर्गत शिवाजी विद्यापीठ, येथे ४ व ५ नोव्हेंबर रोजी कोल्हापूर जिल्हास्तरीय सादरीकरण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत जिल्ह्यातील एकूण १३० स्पर्धकांनी सहभाग नोंदविला असून, त्यापैकी १११ स्पर्धकांनी प्रत्यक्ष ऑनलाइन प्रात्यक्षिकांद्वारे आपल्या नाविन्यपूर्ण संकल्पना सादर केल्या.
सामान्य प्रशासन विभागाच्या शासन निर्णयानुसार १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत राज्यात सेवा संकल्प अभियान राबविण्यात आले. या अभियानाच्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीमार्फत उद्योग विभाग, उच्च व तंत्र शिक्षण विभाग तसेच इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता विभाग यांच्या समन्वयाने ‘इनोव्हेशन चॅलेंज महाराष्ट्र २०२६’ हा राज्यस्तरीय उपक्रम राबविण्याबाबत १८ सप्टेंबर २०२६ रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आला होता. तसेच राज्यातील नाविन्यपूर्ण संकल्पनांना चालना देण्यासाठी ‘महाराष्ट्र सेवा फर्स्ट इनोव्हेशन चॅलेंज’ अभियान राबविण्याबाबत ३ नोव्हेंबर २०२६ रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आला.
या जिल्हास्तरीय सादरीकरण स्पर्धेसाठी शिवाजी विद्यापीठ एन्क्युबेशन सेंटरचे डॉ. हर्षवर्धन पंडित, केआयटी एन्क्युबेशन सेंटरचे डॉ. सुधीर आरळी, डी.के.टी. महाविद्यालयाचे डॉ. गिरीश मेकलके, जिल्हा परिषद कोल्हापूरच्या AHO डॉ. बर्गे तसेच अन्य तज्ज्ञांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. स्पर्धकांनी सादर केलेल्या नाविन्यपूर्ण संकल्पनांचे तज्ज्ञ परीक्षकांकडून मूल्यमापन करण्यात आले.
स्पर्धेदरम्यान शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राजनीश कामत आणि प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव यांनी सदिच्छा भेट देऊन उपक्रमाची पाहणी केली. यावेळी कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त जमीर करीम, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी सारंग कापूरकर तसेच आयटीआय आणि संबंधित कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
राज्यातील युवक, विद्यार्थी आणि नवउद्योजकांच्या नाविन्यपूर्ण कल्पनांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे, नवसंशोधनाला प्रोत्साहन देणे आणि उद्योजकतेला चालना देणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे.