डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडून धम्मातील मूल्ये संविधानाद्वारे देशाला प्रदान: डॉ. आलोक जत्राटकर
schedule01 Apr 25 person by visibility 227 categoryराज्य

* राज्यातील पहिली प्रज्ञावंत राजा ढाले साहित्य धम्मसंगीती यशस्वीरित्या संपन्न
जळगाव : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भगवान बुद्धाच्या धम्मातील मूल्ये भारतीय संविधानाच्या माध्यमातून भारताला प्रदान केली. या मूल्यांच्या बळावर देशाने आजवरची प्रगती साधली आहे, असे प्रतिपादन डॉ. आलोक जत्राटकर यांनी आज येथे केले.
जळगाव येथील सम्यक प्रबोधन मंच यांच्यातर्फे आयोजित राज्यातील पहिल्या ‘प्रज्ञावंत राजा ढाले साहित्य धम्मसंगीती’च्या अध्यक्षस्थानावरुन ते बोलत होते. जळगाव जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील अल्पबचत भवन सभागृहात झालेल्या या कार्यक्रमास मंचावर आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते बापूसाहेब माने, प्रा. गुलाबराव अंबपकर, ज्येष्ठ पत्रकार मधु कांबळे, डॉ. नानासाहेब पटाईत, प्रा. यशवंतराव मोरे उपस्थित होते.
डॉ. जत्राटकर म्हणाले, सर्व मानव समान आहेत, हे समतेचे मूल्य प्रथम मानून भगवान बुद्धांनी त्यांच्या धम्माद्वारे स्वातंत्र्य, बंधुता, सामाजिक न्याय, अहिंसा, धर्मनिरपेक्षता, श्रमप्रतिष्ठा आणि शिक्षण या मूल्यांना प्राधान्य व प्रतिष्ठा दिली. सजग आणि न्यायाकांक्षी समाजनिर्मितीसाठी ही मूल्ये आवश्यक ठरतात. या मूल्यांची देणगी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधानाच्या माध्यमातून भारताला दिली. या मूल्यांचा संकोच होणे देशाला परवडणारे नाही. देशात आजही भेदभावाचे वातावरण आहे. संविधानाच्या प्रास्ताविकेमध्ये ‘आम्ही भारताचे लोक’ असे म्हटलेले आहे. आपल्याला माझे-तुझे असे करण्याऐवजी हा ‘आम्ही सारे एक’ होण्यापर्यंतचा टप्पा गाठण्यासाठी सार्वत्रिक स्तरावर प्रयत्न करणे आवश्यक आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनंतर भारतीय बौद्ध समाजाला लाभलेले राजा ढाले हे खऱ्या अर्थाने प्रज्ञावंत आणि विद्वान नेतृत्व होते. त्यांच्या विचारकार्याचे दस्तावेजीकरण होण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली. त्याचप्रमाणे बौद्ध विहार हे कर्मकांडाची नव्हे, तर सामाजिक-सांस्कृतिक उत्थानाची केंद्रे व्हावीत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
यावेळी ‘धम्मातील पारंपरिकता आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत धम्म’ या परिसंवादात बोलताना प्रा. गुलाबराव अंबपकर यांनी धम्मामध्ये कोणत्याही कर्मकांडाला स्थान न देता प्रक्षिप्त ते सारे काढून टाकणे आणि धम्म त्याच्या वैज्ञानिक शुद्ध स्वरुपात पुढे घेऊन जाणे आवश्यक असल्याचे सांगितले. ‘प्रशीक विद्यार्थी संघ ते राजकीय चळवळ’ या परिसंवादामध्ये मधू कांबळे यांनी प्रशीक ही राजकीय नव्हे, तर सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक अंगाने कार्य करणारी विद्यार्थी संघटना होती. राजा ढाले यांच्या प्रेरणेतून स्थापन झालेल्या या संघटनेने वंचित विद्यार्थ्यांच्या समस्यांना वाचा फोडल्याचे सांगितले. प्रा. नानासाहेब पटाईत यांनी राजा ढाले यांच्या प्रगल्भ दृष्टीकोनामुळे या विद्यार्थी चळवळीला नैतिक अधिष्ठान लाभल्याचे सांगितले. अॅड. एम. एस. अंधेरीकर यांनी या विद्यार्थी संघाच्या निर्मिती आणि वाटचाल याचा इतिहास सांगितला. यावेळी प्राचार्य बापूसाहेब माने (कोल्हापूर) आणि बबन बनसोड (नागपूर) या ज्येष्ठ कार्यकर्त्यांना जीवनगौरव पुरस्कार आणि वसंत सपकाळे, सुनीलकुमार दाभाडे आणि जयेश मोरे यांना अनुक्रमे साहित्य, चित्रकला आणि क्रीडा या क्षेत्रांतील कामगिरीसाठी पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. प्रा. अंबपकर यांनी १४ ठराव मांडले. ते सर्व टाळ्यांच्या गजरात मंजूर करण्यात आले.
धम्मसंगीतीचे उद्घाटन तथागत भगवान बुद्ध, सम्राट अशोक, डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि राजा ढाले यांच्या प्रतिमांना अभिवादन करून व मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. भदन्त पी. संघरत्न महाथेरो यांच्या बुद्धवंदनेने संगीतीला सुरवात करण्यात आली. प्रा. यशवंतराव मोरे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. प्रा. प्रितीलाल पवार यांनी सूत्रसंचालन केले, तर वसंत सपकाळे यांनी आभार मानले. धम्मसंगीतीच्या यशस्वितेसाठी आनंद नवगिरे, संगम गवळे, मुकेश खैरनार, विश्वास सपकाळे, श्रीकांत बाविस्कर, सजन भालेराव, कैलास तायडे, किशोर पगारे, अभय सोनवणे यांनी परिश्रम घेतले.