डॉ. बापूजी साळुंखे इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूटचे विभागीय क्रीडा स्पर्धांमध्ये उत्तुंग यश
schedule25 Feb 25 person by visibility 507 categoryक्रीडा

कोल्हापूर : श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या डॉ. बापूजी साळुंखे इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीच्या खेळाडूंनी इंटर इंजीनिअरिंग डिप्लोमा स्टुडंट्स स्पोर्ट्स असोसिएशन - बी 1 झोनच्या विभागीय क्रीडा स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी करून उत्तुंग यश मिळविले.
कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग ,सातारा ,सांगली जिल्ह्यातील विविध डिप्लोमा इंजीनिअरिंग कॉलेजेस् या स्पर्धेमध्ये सहभागी झाली. डिप्लोमा स्तरावरील या अत्यंत प्रतिष्ठित स्पर्धेमध्ये डॉ. बापूजी साळुंखे इन्स्टिट्यूटने सातत्याने कामगिरी उंचावत सांघिक आणि वैयक्तिक प्रकारांमध्ये प्राविण्य दाखविले. संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडे यांच्या हस्ते यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
वैयक्तिक खेळात वेटलिफ्टिंग स्पर्धेमध्ये खोत स्वयम बाबासाहेब (94 किलो), अर्जुन विनोद नरसुगडे (77 किलो) , ढेरे अविनाश सागर (62 किलो) यांनी तिन्ही गटात विजेतेपद प्राप्त केले. कुस्ती स्पर्धेमध्ये आयुष संजय उदगट्टी (125 किलो), पाटील शुभम धनाजी (61 किलो) यांनी विजेतेपद प्राप्त केले तर 70 किलो गटांमध्ये कांबळे विघ्नेश बाजीराव याने उपविजेतेपद प्राप्त केले. ऍथलेटिक्स प्रकारामध्ये उंच उडीमध्ये शिवतेज राजाराम पाटील या विद्यार्थ्याने उपविजेतेपद प्राप्त केले.
सांघिक प्रकारांमध्ये मुलींच्या बॅडमिंटन , खो - खो आणि कॅरम संघाने अत्यंत चित्तथरारक खेळाचे, कौशल्याचे प्रदर्शन करत विजेतेपद पटकाविले तर टेबल टेनिस मध्ये उपविजेतेपद प्राप्त केले. मुलांच्या टेबल टेनिस संघाने विजेतेपद प्राप्त केले. विजेतेपद प्राप्त सर्व खेळाडू राज्यस्तरीय आंतर विभागीय स्पर्धेमध्ये सहभागी झाले आहेत.
या उत्तुंग यशासाठी सर्व खेळाडूंना श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे, संस्थेच्या सचिवा प्रा. शुभांगी गावडे यांचे मार्गदर्शन लाभले. संस्थेच्या व्यवसायिक शिक्षण समूहाचे संचालक प्राचार्य विरेन भिर्डी, इन्स्टिट्यूटचे प्राचार्य डॉ. सुहास सपाटे यांनी उत्तम नियोजन केले. क्रीडा व्यवस्थापक रजिस्ट्रार अमित आवाड, क्रीडाप्रमुख ऋषिकेश मेथे-पाटील, क्रीडा समन्वयक प्रा. साजिद नाईक, प्रा मृणाल पवार यांनी विद्यार्थ्यांच्या प्रशिक्षणाची, सरावाची उत्कृष्ट व्यवस्था केली. संघ व्यवस्थापकांनी परिश्रम घेतले. क्रीडा क्षेत्रातील या उल्लेखनीय यशामुळे इन्स्टिट्यूटचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.