सतेज पाटील पुणे शहर, जिल्ह्याचे निरीक्षक
schedule04 Apr 25 person by visibility 126 categoryराज्य

कोल्हापूर : पुणे शहर आणि जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाच्या कार्याचा आढावा घेण्यासाठी विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी शुक्रवारी त्यांची नियुक्ती केली आहे.
सर्व जिल्ह्यांमध्ये पक्ष संघटनेच्या कार्याचा आढावा घेण्याचा निर्णय प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांनी घेतला आहे. त्यांच्या सूचनेनुसार पुण्यासाठी निरीक्षकपदी पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पुणे येथे जाऊन तालुकाध्यक्ष, नेतेमंडळी, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी आपण चर्चा करावी, तालुकानिहाय बैठका घ्याव्यात आणि १५ दिवसांत अहवाल द्यावा, असे पाटील यांना पाठविलेल्या नियुक्तिपत्रात म्हटले आहे.
जिल्ह्याच्या पक्षप्रभारींना सोबत घेऊन, त्यांना दौऱ्यातही सोबत घेऊन आणि त्यांच्याशी चर्चा करून अहवाल पाठवावा, अशाही सूचना देण्यात आल्या आहेत.
एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादी आणि भाजपचा वरचष्मा आहे. अशा परिस्थितीत पुण्यातील काँग्रेसच्या नेमक्या स्थितीचा अहवाल देण्याची महत्त्वाची जबाबदारी सतेज पाटील यांच्यावर देण्यात आली आहे.