कोल्हापूर शहरातील ५३ रिक्षांवर कारवाई; २३ हजार ८०० रुपयांचा दंड वसूल
schedule30 Aug 26 person by visibility 105 categoryगुन्हे
कोल्हापूर : शहरातील वाहतूक शिस्त बिघडवणाऱ्या आणि नियम मोडणाऱ्या रिक्षा चालकांवर शहर वाहतूक नियंत्रण शाखेने धडक कारवाई केली आहे. स्टॉपशिवाय इतरत्र रिक्षा थांबवणे, ओव्हरलोड प्रवासी बसवणे, गणवेश न घालणे आणि जादा भाडे आकारणे यांसारख्या विविध कारणांवरून ५३ प्रवासी रिक्षा वाहनांवर कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून २३ हजार ८०० रुपये तडजोड शुल्क आकारण्यात आले आहे.
तसेच, वाहन चालकांकडून ३४ हजार रुपयांचा प्रलंबित दंड देखील वसूल करण्यात आला आहे.
◼️कारवाईची प्रमुख कारणे:
* रिक्षा स्टॉपवर क्षमतेपेक्षा जास्त रिक्षा थांबवणे आणि चौकात किंवा सिग्नलवर अवैध थांबा करणे.
* एस.टी. स्टँड परिसरात विहित केलेल्या ठिकाणी रिक्षा न उभी करता इतरत्र व्यवसाय करणे.
* नो-एन्ट्री किंवा विरुद्ध दिशेने (रोंग साईड) रिक्षा चालवून वाहतूक कोंडी निर्माण करणे.
* गणवेश परिधान न करणे, परवाना सोबत न बाळगणे आणि प्रवाशांना भाडे नाकारणे किंवा अरेरावी करणे.
◼️रिक्षा चालकांना प्रशासनाचे आवाहन:
शहरातील सर्व रिक्षा चालकांनी ड्रेसकोडचा वापर करावा, नियमाबाह्य भाडे आकारू नये, प्रवाशांशी गैरवर्तन करू नये आणि चौकात रिक्षा थांबवून वाहतुकीस अडथळा निर्माण करू नये, असे आवाहन शहर वाहतूक नियंत्रण शाखेकडून करण्यात आले आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चालकांवर मोटर वाहन कायद्यान्वये अशीच व्यापक स्वरूपात कठोर कारवाई सुरू राहणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक नंदकुमार मोरे यांनी दिली आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक यांच्या आदेशानुसार आणि शहर विभागाच्या उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली शहर वाहतूक शाखेच्या अधिकारी व अंमलदारांनी पार पाडली आहे.