कोल्हापूर शहरासह महापालिकेच्या हद्दीतील गांधीनगरमधून पाच हजार किलो प्लॅस्टिक जप्त
schedule21 Mar 25 person by visibility 670 categoryमहानगरपालिका

कोल्हापूर : महापालिकेच्या आरोग्य विभागाच्यावतीने शहरात एकल वापर प्लॅस्टिक बंदी मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. प्रशासक के. मंजूलक्ष्मी व अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांच्या मार्गदर्शनाखाली हि मोहिम राबविण्यात येत आहे. शुक्रवारी दुपारी या मोहिमेअंतर्गत सहा.आयुक्त कृष्णा पाटील यांनी चार पथकांमार्फत महालक्ष्मी मंदीर परिसर, महाद्वार रोड, जोतिबा रोड, ताराबाई रोड, बाजार गेट परिसर, लक्ष्मीपूरी व महापालिका हद्दीतील गांधीनगर परिसरात एकल वापर प्लॅस्टिकची तपासणी करण्यात आली.
यावेळी दुकानदार, रोडवरील फळविक्रेते, भाजी विक्रेते व इतर किरकोळ 78 विक्रेत्यांकडे वापरण्यात येणारे सिंगल यूज प्लॅस्टिक जप्त करण्यात आले. या सर्वांकडून अंदाजे 5 हजार किलो प्लॅस्टिक जप्त करण्यात आले. येथून पुढे प्लास्टिकचा वापर करु नये अशा सक्त सूचना सर्वांना देण्यात आल्या आहेत.
दुपारी सहा.आयुक्त कृष्णा पाटील यांनी सर्व आरोग्य निरिक्षक व शहर समन्वयक यांना आपल्या कार्यालयात बोलवून प्लॅस्टिक मोहिमबाबत माहिती घेतली. या मोहिमेवर जाणेपुर्वी सर्वांचे मोबाईल बंद ठेवून आपल्या कार्यालयात जमा करुन घेतले. त्यानंतर महालक्ष्मी मंदिर परिसरापासून तपासणीस सुरुवात करुन महापालिका हद्दीतील गांधीनगर परिसरापर्यंत तपासणी करत फिरती केली. यावेळी ते गाडीमागे एक डंपर घेऊनच फिरत होते. फिरती दरम्यान जप्त केलेले प्लॅस्टीक या डंपरमध्ये जमा करुन घेतले जात होते. सदरची कारवाई सहाय्यक आयुक्त कृष्णा पाटील, मुख्य आरोग्य निरिक्षक डॉ.विजय पाटील, विभागीय आरोग्य निरीक्षक व आरोग्य निरिक्षक, मुकादम व कर्मचाऱ्यांनी केली.
तरी महानगरपालिकेच्या हद्दीमधील सर्व आस्थापना, व्यापारी व संस्था यांनी एकल वापर (सिंगल युज) प्लॅस्टिकचा वापर बंद करणेचा आहे. जर शहरामध्ये एकल वापर (सिंगल युज) प्लॅस्टिकचा वापर करताना आढळल्यास त्या आस्थापना, संस्था व नागरीकांवर आरोग्य विभागामार्फत दंडात्मक कांरवाई करण्यात येणार आहे. तरी सर्वांनी सिंगल युज प्लॅस्टीकचा वापर टाळावा व कापडी पिशवीचा वापर करावा असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.