गडचिरोली पोलीस दलाच्या बळकटीसाठी 34 नव्या वाहनांचा ताफा दाखल
schedule27 Dec 25 person by visibility 72 categoryराज्य
गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील अंतर्गत सुरक्षा व्यवस्था अधिक सक्षम, गतिमान व प्रभावी करण्याच्या दृष्टीने गडचिरोली पोलीस विभागाला 30 स्कॉर्पिओ वाहने, 2 बस व 2 मोटारसायकल असा एकूण 34 वाहनांचा ताफा उपलब्ध करून देण्यात आला. या नव्या वाहनांचे वितरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून करण्यात आले.
कार्यक्रमाला वित्त, नियोजन, कृषी, मदत व पुनर्वसन, विधी व न्याय, कामगार राज्यमंत्री तथा गडचिरोलीचे सहपालकमंत्री अॅड आशिष जयस्वाल, गृह (ग्रामीण), गृहनिर्माण, शालेय शिक्षण, सहकार, खनिकर्म राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, आमदार डॉ. मिलिंद नरोटे नक्षलविरोधी अभियानाचे विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील, पोलीस उपमहानिरीक्षक अंकीत गोयल, जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा, जिल्हा पोलीस अधीक्षक श्री निलोत्पल उपस्थित होते.
या वाहनांमुळे दुर्गम व आदिवासी भागात जलद गस्त, आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ प्रतिसाद, नक्षलविरोधी मोहिमा, तसेच दैनंदिन पोलीस कामकाज अधिक कार्यक्षमतेने पार पाडणे शक्य होणार आहे. स्कॉर्पिओ वाहने गस्त व ऑपरेशनल कामांसाठी उपयुक्त ठरणार असून, बस वाहनांचा उपयोग पोलीस पथकांच्या वाहतुकीसाठी तसेच विशेष मोहिमांसाठी होणार आहे. मोटारसायकलींमुळे अरुंद व दुर्गम मार्गांवरही पोलीस उपस्थिती वाढण्यास मदत मिळणार आहे.





