राधानगरीत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचा मोठा दणका; जुगार अड्ड्यावर छापा टाकून ८ लाखांचा मुद्देमाल जप्त!
schedule28 Feb 26 person by visibility 227 categoryगुन्हे
कोल्हापूर : जिल्ह्यातील अवैध व्यवसायांचे समूळ उच्चाटन करण्याच्या मोहिमेअंतर्गत, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने राधानगरी तालुक्यातील तिटवे येथे सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर धडक कारवाई केली. या छाप्यात ८ लाख २ हजार ९६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून ८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक योगेशकुमार व अपर पोलीस अधीक्षक डॉ. बी. धिरजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्या पथकाने ही कारवाई केली. तिटवे गावच्या हद्दीत अरविंद बुजरे यांच्या शेताजवळ उघड्यावर जुगार सुरू असल्याची माहिती पोलीस अंमलदार संजय देसाई व राजू कोरे यांना मिळाली होती. त्यानुसार २७ फेब्रुवारी २०२६ रोजी पोलिसांनी सापळा रचून छापा टाकला.
कारवाईमध्ये रोख रक्कम: ६७,१८० रुपये, मोबाईल संच: ०५ नग, दुचाकी: ०९ मोटार सायकली, इतर साहित्य: जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले.
या कारवाईत संशयित चंद्रकांत पाटील (आदमापूर), शंकर पोवार (तुरंबे), नवनाथ वाईंगडे (सरवडे), शुभम चव्हाण (चंद्रे), तुळशीदास कांबळे (बेले), विनोद पाटील, अशोक पोवार आणि प्रविण गोजारे या ८ जणांसह त्यांच्या इतर साथीदारांवर राधानगरी पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार कायद्यान्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
या यशस्वी कामगिरीत पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे यांच्यासह संजय देसाई, राजू कोरे, सागर चौगुले व अन्य कर्मचाऱ्यांचा समावेश होता. या कारवाईमुळे जिल्ह्यातील अवैध धंदे चालवणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.