हातकणंगलेत गुंडाचा खून; औद्योगिक वसाहती कामगार पुरविण्याच्या वर्चस्वातून गेम...
schedule24 Sep 24 person by visibility 394 categoryगुन्हे
हातकणंगले : औद्योगिक वसाहती कामगार पुरवठा करण्याच्या वर्चस्वातून विनायक महादेव बजयंत्री ऊर्फ कोरवी (वय ४२ रा. पाच तिकटी, हातकणंगले) या गुंडाचा अज्ञात तिघांनी खून केला. ही घटना सोमवारी रात्री दहा वाजाता इचलकरंजी रोडवरील रेल्वे भुयारी मार्गाशेजारील अध्यक्ष बिअर बारमध्ये घडली. या घटनेचा गुन्हा रात्री उशिरा पोलिस ठाण्यात दाखल झाला आहे. विनयक हा गुंड प्रवृत्तीचा होता त्याची दादागिरी मोडून काढण्यासाठी हा गेम झाल्याची चर्चा परिसरात आहे.
सोमवारी रात्री दहाच्या सुमारास त्याला मोबाईलवर फोन करून अध्यक्ष बिअर बारमध्ये बोलावून घेण्यात आले होते. टेबलवर बसल्यानंतर अज्ञात तीन मारेकऱ्यांनी पूर्वनियोजन करून त्यांच्या डोक्यात लोखंडी रॉड घालून त्यांला रक्तबंबाळ केले. बिअरच्या बाटल्या फोडून त्यांच्या पोटात खुपसल्यामुळे तो जाग्यावरच कोसळला. त्यातच त्याचा मृत्यू झाला. खूनानंतर अज्ञात मारेकऱ्यांचा पोलिस शोध घेत आहेत.
विनायक कोरवी हा पोलिस रेकॉर्डवरील आरोपी होता. हातकणंगले परिसरामध्ये त्यांची दहशत होती. गावामध्ये त्यांची गुंड अशी ओळख होती. हातकणंगले शहराच्या पूर्वभागांत असलेल्या औद्योगिक वसाहतीमध्ये तो कामगार पुरवठा करत होता. कामगार पुरवठा करण्यावरून त्यांची नेहमी दादागिरी होती. ती मोडून काढण्यासाठीच त्यांच्यावर हल्ला करण्यात आल्याचे समजते.