प्रतिभाशाली संत रोहिदास
schedule12 Feb 25 person by visibility 385 categoryसामाजिक

आज दि.१२ फेब्रुवारी (माघ शुद्ध पोर्णिमा) संत रोहिदास यांच्या जयंतीनिमित्त डाॅ. सुनीलकुमार सरनाईक यांचा विशेष लेख...
भारतभूमी ही वीरांची, संतांची व सत्पुरुषांची पवित्र भूमी आहे. या आपल्या देशात प्रत्येक प्रांतात अनेक अनेक संत होऊन गेले आहेत. त्यातील एक नाव म्हणजे संत रोहिदास महाराज होत.
संत रोहिदास महाराज यांचा जन्म हा काशी शहराच्याजवळ असलेल्या मांडूर या गावात इ.स. १४३३साली झाला, असं सांगण्यात येते. तर त्यांचा जन्म हा वारासणी येथे गोवर्धनपूर येथे झाला असाही समज आहे. परंतु संत रविदास यांनी रैदास रामायणात आपले जन्मठिकाण हे मांडूर असे सांगितले आहे.
संत रोहिदास यांना अनेक नावांनी ओळखले जाते. त्यांचे नाव हे सूर्याप्रमाणे तेजस्वी असल्यानं रविदास असे ठेवण्यात आले. त्यांचे भारतवर्षात कायमस्वरूपी कोरले गेलेले नाव म्हणजे संत रोहिदास. त्याचसोबत बंगालमध्ये त्यांना रुईदास, रुयदास या नावानं ओळखले जाते. तर राजस्थानमध्ये रोहिदास, मराठीत रविदास आणि पंजाबमध्ये रैदास अशी त्यांची प्रचलित नावे आहेत. त्यांचा जन्म चर्मकार समाजात झाला. साहजिकच त्यांच्या वडीलांचा व्यवसाय हा चांभार म्हणजेच चप्पल किंवा जोडे बनविणे हा होता. त्यांचे वडील हे काशीक्षेत्री येणाऱ्या-जाणाऱ्या साधुसंतांची आपल्या परीने जमेल तेवढी सेवा करीत असत.
आई-वडिलांच्या धार्मिक व आध्यात्मिक संस्कारामुळे त्यांना लहानपणापासूनच कीर्तन, प्रवचन ऐकण्याची आवड निर्माण झाली होती. घरच्या एकुणच धार्मिक संस्कारामुळे त्यांच्या मनात देवभक्तीची ओढ निर्माण झाली. संत रोहिदास हे रामभक्तीत दंग असायचे. सतत तोंडाने राम नामाचा जप करायचे. संत रोहिदास यांनी अमूल्य असे समाजकार्य केले. त्यांनी समाजाला कल्याणाचा मार्ग दाखवला.त्यांनी सुंदर, अर्थपूर्ण अभंगरचना केली आहे. गुरूग्रंथ साहेब या शिखांच्या धर्मग्रंथामध्ये रोहिदासांच्या ४१ अभंगाचा समावेश आहे.
संत रोहिदास महाराज यांनी गुण-निर्गुण, शहाणपण, सामाजिक न्याय, एकता, समानता याबद्दल त्यांनी समाजाला शिकवण दिली.'मन चंगा तो कठौती मैं गंगा' हा त्यांचा लोकप्रिय हिंदी दोहा आहे. यात ते म्हणतात की, ''माणसाचे मन पवित्र असेल, त्याला जातीयवादाचा स्पर्श झाला नसेल तर चांभाराच्या कुंडातही गंगाजलाचं पावित्र्य दिसून येते, त्यासाठी आपला दृष्टीकोन तसा असायला हवा.''
संत रोहिदास यांनी भारतभर भ्रमंती करून समता, स्वातंत्र्य आणि बंधुत्वाचे धडे देत देशाला अध्यात्मिक आणि समाजिक उंचीवर नेले. जातीधर्मभेद त्यांना मान्य नव्हता. सर्व मानवप्राणी ही त्या एकाच ईश्वराची लेकरं आहेत, असा संदेश ते देत असत.
मागासवर्गीय चर्मकार समाजात जन्माला आलेल्या संत रोहिदासांना इतके धार्मिक वेड लागले होते की ते ‘सेवा अन् साधना’ करण्यातच स्वत:ला धन्यता मानू लागले होते. संत रोहिदास चर्मकार समाजाचे असल्याने त्याकाळी दलितांना म्हणजेच चर्मकारांना मंदिरात प्रवेश दिला जात नसे. स्पर्श तर दूरच परंतु सावली पडली तरी शिव्या शाप मिळत असे. इतकी कठीण सामाजिक परिस्थिती असताना रोहिदासांनी स्वत:च्या हातानेच प्रभू रामचंद्राची मूर्ती तयार करुन तिची पूजा करण्यास सुरुवात केली होती. दगडाच्या मंदिरातच देव असतो, असे नाही तर प्रत्येक प्राणीमात्रांच्या अंतःकरणात तो वसला आहे,अशी त्यांची शिकवण होती.
संत रोहिदासाची ईश्वरभक्ती फारच दांडगी होती. ईश्वराशी नामस्मरणात ते एकरुप होत असत. दिवसभर ईश्वर ईश्वरचिंतनात त्यांचा वेळ जात असे , अर्थात त्यामूळे रोहिदासांच्या आई-वडीलांना त्यांच्या उपजिविकेसाठी व भवितव्यासाठी चिंता वाटत असे, त्यांच्या घरात चप्पल व जोडे तयार करण्याचा पिढीजात धंदा होता, पण रोहिदास यांना घरची चर्मकला अवगत नव्हती .जोडे करण्याच्या व्यवसायात त्यांचे बिलकुल लक्ष नव्हते. त्यामुळे चामडे कमावणे व जोडे तयार करणे हा पारंपरिक व्यवसायाकडे त्यांचे दुर्लक्ष होत होते. त्यामुळे त्यांच्या आईवडिलांना त्यांच्या भवितव्याच्या बाबतीत चिंता वाटत होती. संत रोहिदासाचे आप्त, नातेवाईक, शेजारी पाजारी त्यांच्या घरी येत तेव्हा रोहिदासाच्या भवितव्याबद्दल सल्ले देऊन जात. अशा सल्ल्याचा परिणाम आई-वडीलांवर होतच असे. रोहिदासांच्या आई-वडीलांनी मनाशी एकदा ठरवूनच टाकले की रोहिदासाचे लग्न केले की, त्याचे लक्ष ‘संसारात रमेल अन् ईश्वर भक्तीचे वेड कमी होऊन’ आपल्या चर्मकलेच्या व्यवसायात लक्ष लागेल. संत रोहिदासाच्या आईवडिलांनी मनात ठरविल्याप्रमाणे त्याचा विवाह लोमादेवी या मुलीशी करुन दिला. संत रोहिदासांची पत्नी लोमादेवी ही सुशिल, सोशिक व सात्त्विक अशीच होती. स्वभाव गुणानुसार संत रोहिदास ईश्वर भक्तीपासून तसूभरही दूर गेले नाहीत अन् लोमादेवी सुद्धा रोहिदासांना भक्ती मार्गापासून दूर करु शकली नाही. संसाराच्या पाशात पडल्यामुळेही काही फरक पडला नाही. पुढे अर्थार्जनासाठी पारंपरिक धंदा करत असतांनाच संत रोहिदासांचे मन ईश्वर भक्तीत रमू लागले. मिळवलेला पैसा अडका ते साधुसंत, मंदिर व आध्यात्मिक तसेच ज्ञानार्जन यासाठी खर्च करीत. याबाबत त्यांना त्यांच्या आईवडिलांनी खूप समजावण्याचा प्रयत्न केला. असे असताना संत रोहिदासांवर काही एक परिणाम झाला नाही. संसार व धन या दोहोपेक्षा रोहिदासांना ईश्वर भक्तीच श्रेष्ठ नि मनाला संतुष्ट करीत असे. साधु-संताची सेवा करणे संत रोहिदासांना मनापासून आवडे, धार्मिक आणि पारमार्थिक गोष्टी करण्यात त्यांना मनस्वी आनंद वाटे. त्याच्याइतका आनंद कशातच वाटत नव्हता. संसारात लक्ष नसलेल्या संत रोहिदासाला अन् संसाराच्या पाशात गुंतवू न शकणार्या ईश्वरभक्त असलेल्या आपल्या पतीसाठी लोमादेवीने हे सारे आनंदाने स्वीकारले. पूर्वी पतीच्या आज्ञेप्रमाणेच स्त्रियांना वागावे लागे. पतिसेवा, पती आज्ञा शिरसावंद्य मानणार्या पतीव्रता लोमादेवीना संत रोहिदासांची ईश्वर भक्ती कधीही गैर वाटली नाही. लोमादेवीने सुध्दा साधुसंताची सेवा व भजनातच रममान होण्यात धन्यता मानली. संसारात या दोघा उभयतांची ईश्वरभक्ती अखंड चाले. मात्र पोटापाण्याची आबाळ होई. दोघांनाही उपवास घडत, तरी सुद्धा त्या दोघांना कधीच काळजी वाटली नाही. उपास तापास या गोष्टी ईश्वर भक्तीपुढे गौण होत्या. संसारात गुंतून राहण्याचा मोह नसल्यामुळे तसेच धनाची अभिलाषा नसल्यामुळे एकवेळचे भोजन सुद्धा पुरेसे असे. त्यामुळे पोटासाठी ईश्वर भक्तीकडे दुर्लक्ष कधीच झाले नाही. ती काळजी दोघांनाही कधीच पडली नाही.
संत रोहिदास यांचा धर्मशास्त्राचा’ अभ्यास फारच दांडगा होता. ‘सखोल विचार व चिंतनशील’ अभ्यासामुळे त्यावेळच्या मोठमोठ्या धर्म पंडितांना वादविवादामध्ये पराजित होऊन शरणागती पत्करावी लागे. याच काळात संत कबीर यांच्याशी त्यांची ओळख झाली. ‘संत रोहिदासांची विद्वत्ता, बुद्धीमत्तेची पारख पाहून संत कबीरांनी आपल्या गुरुकडे म्हणजेच संतांचे महंत गुरु रामानंद स्वामी यांच्याकडे संत रोहिदासांना घेऊन गेले. गुरु रामानंद स्वामी यांनी संत रोहिदासांची अचूक पारख केली. संत रोहिदासांसारख्या ‘प्रतिभावंत’ अशा शिष्याला ‘संपूर्ण गुरुत्वच’ बहाल केले. गुरु रामानंद स्वामी यांनी संत रोहिदासांसाठी आपल्याकडील ‘ज्ञानाचा सागरच’ खुला गेला. संत कबीर व संत रोहिदास या शिष्यांना गुरुकडून ‘ज्ञानामृत’ मिळाले त्या ज्ञानामृतानी दोघेही ‘ब्रह्मज्ञानी’ झाले. चर्मकाराचा मुलगा संत झाला. संत रोहिदास ब्रह्मज्ञानी झाले हे किती महान महद् भाग्याचे म्हणावे लागेल. संत रोहिदासाच्या संत मीराबाई या शिष्या होत्या. ईश्वराच्या भक्तीचे मर्म जाणून ईश्वराशीच एकरुप असलेले संत रोहिदास यांना रविदास या नावाने ही ओळखले जाते. धर्मशास्त्राचा गाढा अभ्यास असलेले ज्ञानी संत रोहिदास यांनी भागवत धर्माची पताका अखंडपणे फडकावली. चितोड येथे या संतश्रेष्ठ ईश्वर भक्ताची छत्री बांधलेली आहे. संत कबीर म्हणतात त्याप्रमाणे ‘संत बीज पलटे नाही, जुग जुग जाये अनंत, नीच उंच घर जन्म ले, रहे संत के संत’ याची प्रचिती संत रोहिदास या प्रतिभाशाली ईश्वर भक्ताच्या भक्तीची येते.संत कबीर यांच्या प्रमाणे संत रोहिदास यांनी सर्वधर्मसमभाव व सामाजिक समतेचे विचार मांडले आहेत .
संत रोहिदास महाराज यांना ११७ वर्षाचे दीर्घायुष्य लाभले, इ.स.१५४० मध्ये त्यांनी उत्तरप्रदेश येथील चित्तोडगड येथे जगाचा निरोप घेतला. स्पृश्य अस्पृश्य, उच्चनिच्च, जातीभेद, धर्मभेद हे त्यांना मान्य नव्हते. सर्वधर्मसमभाव आणि समतेच्या विचाराची भागवतधर्माची पताका त्यांनी अखंडपणे वागवली, त्यांनी आपल्या अल्पशा अभंगातून सुध्दा मानवी कल्याणाचा संदेश दिला आहे.
✍️ डाॅ. सुनीलकुमार सरनाईक, कोल्हापूर.
(लेखक भारत सरकारतर्फे स्वामी विवेकानंद राष्ट्रीय पुरस्काराने तसेच आचार्य बाळशास्त्री जांभेकर दर्पण पत्रकार पुरस्काराने सन्मानित असून करवीर काशी चे संपादक आहेत.)