शिल्पकार राम सुतार यांच्या प्रतिभासंपन्न कला कर्तृत्वाचा गौरव – पालक मंत्री जयकुमार रावल
schedule15 Nov 25 person by visibility 57 categoryराज्य
मुंबई : महाराष्ट्र शासनाने जगप्रसिद्ध शिल्पकार व धुळे जिल्ह्याचे सुपुत्र राम सुतार यांना ‘महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2024’ देऊन त्यांच्या समर्पित प्रतिभासंपन्न कलाकर्तृत्वाचा गौरव केला असून राम सुतार यांनी आपल्या प्रतिभा, समर्पण आणि कष्टातून जागतिक पातळीवर भारताचा गौरव वाढवला आहे. महाराष्ट्र भूषण पुरस्कारामुळे त्यांचे कार्य अधिक उजळून निघाले असून हा क्षण धुळे जिल्ह्यासाठी अभिमानाचा असल्याचे सांगत धुळे जिल्ह्याच्या वतीने पालकमंत्री जयकुमार रावल यांनी शिल्पकार राम सुतार यांचे अभिनंदन केले आहे.
जगप्रसिद्ध शिल्पकार राम सुतार यांना महाराष्ट्र शासनाचा सर्वोच्च नागरी सन्मान ‘महाराष्ट्र भूषण 2024’ पुरस्कार नोएडा (उत्तर प्रदेश) येथील त्यांच्या राहत्या घरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार आदी उपस्थित होते.
पालकमंत्री जयकुमार रावल यांनी सांगितले की, शिल्पकार राम सुतार यांनी आपल्या प्रतिभासंपन्न व समर्पित कलाकर्तृत्वातून अनेक अजरामर शिल्पकृती निर्माण केल्या आहेत. आज शंभर वर्षांचे असूनही त्यांच्या डोळ्यांसमोर केवळ जगातील उत्तम आणि उत्कृष्ट कलाकृती साकारण्याचे ध्येय आहे. त्यांनी अनेक महापुरुषांच्या शिल्पकृती साकारताना अविश्रांत मेहनत, धैर्य आणि कलाक्षेत्रातील अद्वितीय समर्पण दाखवले. महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा त्यांच्या प्रतिभेचा आणि योगदानाचा सन्मान आहे, असे ते म्हणाले.
राम सुतार हे धुळे जिल्ह्यातील गोंदूर गावाचे सुपुत्र असून त्यांनी देशातच नव्हे तर जगभरात असंख्य सुप्रसिद्ध शिल्पे उभी केली आहेत. गुजरात मधील सरदार वल्लभभाई पटेल यांच्या ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ या जगातील उंच पुतळ्याची उभारणी त्यांनी केली आहे. याशिवाय भगवान बुद्ध, भगवान महावीर, स्वामी विवेकानंद यांच्यासह अनेक महान विभूतींच्या मूर्ती त्यांनी अत्यंत चित्तवेधक आणि जिवंत भासणाऱ्या शैलीत साकारल्या आहेत. या अद्वितीय शिल्प कलागुणामुळे त्यांनी महाराष्ट्रासह धुळे जिल्ह्याचे नाव सातासमुद्रापार पोहोचवले आहे, असे पालक मंत्री रावल म्हणाले.