शिरोळमध्ये धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या भव्य शिल्पाचे १३ मे रोजी ऐतिहासिक अनावरण
schedule09 May 26 person by visibility 106 categoryराज्य
शिरोळ : शिरोळ शहराच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंद होईल असा ऐतिहासिक आणि अभिमानास्पद सोहळा येत्या १३ मे रोजी पार पडणार आहे. शहरातील मानबिंदू समजल्या जाणाऱ्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौक येथे उभारण्यात आलेल्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या भव्य शिल्पाचे अनावरण मोठ्या दिमाखात आणि उत्साहपूर्ण वातावरणात होणार आहे. आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या स्थानिक विकास निधीतून साकारण्यात आलेले हे शिल्प शिरोळ तालुक्यातील पहिले शिल्प ठरत असून, भविष्यात शिरोळची नवी ओळख म्हणून ते प्रसिद्ध होणार आहे.
सायंकाळी ठीक ५ वाजता होणाऱ्या या भव्य सोहळ्यात आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या हस्ते शिल्पाचे अनावरण करण्यात येणार आहे. यावेळी शहरातील प्रमुख नेते, पदाधिकारी, विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी, ज्येष्ठ नागरिक, तरुण मंडळांचे कार्यकर्ते तसेच हजारो शिवभक्त उपस्थित राहणार आहेत. संपूर्ण चौक परिसर भगव्या रंगात सजविण्यात येणार असून शिवमय वातावरण अनुभवायला मिळणार आहे.
कार्यक्रमानिमित्त विविध सांस्कृतिक आणि आकर्षक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मिरज येथील साई लाईटचा भव्य लाईट शो, आकर्षक आतषबाजी आणि पश्चिम महाराष्ट्रातील प्रसिद्ध जय भवानी लेझीम पथक नरसोबावाडी यांची मानवंदना हे प्रमुख आकर्षण ठरणार आहे. तसेच संतूबाई तालीम हेरवाड यांच्या वतीने शिवकालीन मर्दानी खेळांचे थरारक सादरीकरण करण्यात येणार असून, शंभो ऑडिओच्या आधुनिक ब्रँड साऊंड सिस्टीममुळे संपूर्ण वातावरण दणाणून जाणार आहे.
याशिवाय ३ ते १४ वर्षे वयोगटातील मुलांसाठी शिवकालीन वेशभूषा स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. तसेच तरुणांसाठी भव्य रिल स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले असून विजेत्यांना खास आणि आकर्षक भेटवस्तू देण्यात येणार आहेत.
या ऐतिहासिक आणि अभिमानास्पद सोहळ्याला शिरोळसह संपूर्ण तालुक्यातील शिवभक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना मानवंदना द्यावी, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.