मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून सिमावासियांना आशा...!
schedule01 Apr 25 person by visibility 245 categoryराज्य

✍️ डाॅ. सुनीलकुमार सरनाईक, कोल्हापूर
'मी देवेंद्र सवीता गंगाधरराव फडणवीस, ईश्वरसाक्ष शपथ घेतो की...' हा आवाज पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या जनतेच्या कानावर पडला, आणि भारतीय जनता पक्षाच्या लहानमोठ्या सर्वच नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी प्रचंड जल्लोष केला, हे आपण सर्वांनी दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवर पाहिले. 'मुख्यमंत्री' या बिरूदासह देवेंद्र फडणवीस हे दुसऱ्यांदा महाराष्ट्राच्या संवैधानिक नेतृत्वाला सिद्ध झाले आहेत. राजकीय कारकिर्दीच्या प्रारंभापासूनच त्यांना प्रचंड राजकीय संघर्ष करावा लागला. डाव-प्रतिडावाचा सामनाही करावा लागला. शिवाय २०१९ पासून सातत्याने अपमानाचे वार झेलावे लागले, मात्र न थकता, नाउमेद न होता कार्यरत राहिलेले देवेंद्र फडणवीस यांनी "मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन" ही आपली भविष्यवाणी खरी करून दाखवली. अत्यंत कौशल्याने व चाणाक्षपणे प्रचंड सहनशीलता ठेवून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी दुसऱ्यांदा शपथ घेतली. महाराष्ट्राच्या विधिमंडळात माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह राष्ट्रवादीचे खमके नेते अजित पवार यांना ही त्यांनी आपल्या सोबत आणले. ही नव्या दमाची फौज आपल्या सैन्यात डेरदाखल केली आहे.
फडणवीस शिंदे पवार या सरकारबद्दल आपल्या कार्यातून महाराष्ट्रातीलच नव्हे तर सीमाभागातील मराठी जनतेचेही भले होईल अशी अपेक्षा केली तर ती अनाठायी होणार नाही.. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शिस्तीत व संस्कृतीत वाढलेले भारतीय जनता पक्षाचे निष्ठावंत व निष्कलंक चारित्र्याचे म्हणून नेत्यांना व कार्यकर्त्यांना प्रिय असलेले देवेंद्र फडणवीस हे शांत, संयमी पण योग्य प्रश्नांसाठी योग्यवेळी आक्रमक होणारे, ठाम भूमिका घेणारे असे नेतृत्व आहे. मराठी माणसांच्या न्याय्य हक्कासाठी ते निश्चितच योग्य व कठोर भूमिका घेणारे नेते आहेत.
राज्यातील शेतकरी व कामगारांच्या हितासाठी झटतानाच सीमाभागातील मराठी माणसांच्या हितासाठीही ते कटीबद्ध आहेत. महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे, तरीही यापुढे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस सीमाप्रश्नांसाठी प्राणपणाने लढतील , अशी खात्री वाटत आहे.
महाराष्ट्रापुढे जे प्रश्न उभे आहेत ते सर्व फडणवीस यांना ज्ञात आहेत. तसा त्यांचा दांडगा व्यासंग ही आहे आणि अनुभव ही आहे. नियतीने त्यांच्यावर दुसऱ्यांदा मुख्यमंत्री पदावर विराजमान केले आहे. सीमाप्रश्नांचे गेल्या ६५ वर्षांपासून भिजत घोंगडे पडले आहे. त्यांचा सोक्षमोक्ष लावून महाराष्ट्राच्या कक्षा विस्तारण्याच्या, महाराष्ट्राच्या नकाशाला सीमाभाग जोडण्यासाठीच्या प्रयत्नांची जबाबदारी आणून सोडली आहे. सीमाप्रश्नाच्या बाबतीत महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात तीव्र भावना आहेत. सीमाप्रश्नासारखी इतिहासातील घोडचूक सुधारण्याची जबाबदारी फडणवीस यांच्यासारख्या योग्य नेतृत्वावर येऊन ठेपलेली आहे. ते आपली जबाबदारी मोठ्या हिमतीने व कौशल्याने पार पाडतील अशी आशा आम्हाला तसेच संपूर्ण महाराष्ट्राला आणि सीमाभागाला आहे. अर्थात आताच्या नवीन सरकारच्या काळात सीमाप्रश्न सुटला तर हा एक नवा इतिहास घडणार आहे. हा महासत्तांतराचा काळ आहे. जे कधी घडेल असा स्वप्नातही कोणी विचार केला नसेल असे घडताना दिसते आहे. त्याचा लाभ इथल्या मातीला व्हायला पाहिजे अशी जनतेची सार्थ अपेक्षा आहे. खुद्द फडणवीस, शिंदे ,पवार यांचे सरकार अनेक निर्णय धडाडीने घेत आहेत, याची प्रचिती महाराष्ट्राच्या जनतेला येत आहे. महाराष्ट्राच्या जनतेने भाजप शिवसेना युतीला कौल दिला असतांनाही उध्दव ठाकरे यांनी शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस व राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या बरोबर युती करून मुख्यमंत्री पद घेतले, व आपल्या मुलाला आदित्य ठाकरे यांना ही मंत्रीमंडळात संधी दिली, हे महाराष्ट्राच्या जनतेला मान्य नव्हते. त्यामुळे शिवसेनेच्या एकनाथ शिंदे यांच्यासह बहुसंख्य आमदारांनी फुटून भाजपशी युती केली, बहुमताने भाजपा सरस असूनही अनपेक्षितपणे एकनाथ शिंदे यांच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ पडली, फडणवीस यांनी नाईलाजाने का होईना पण हा निर्णय मान्य केला व आपला संयम सुटू दिला नाही. जेव्हा आपली वेळ आली, तेव्हा त्यांनी योग्य खेळी केली व सर्व अडचणींवर त्यांनी मात केली. आता ते मुख्यमंत्री झाले. सत्तेचे सिंहासन आणि मुख्यमंत्री पदाचा राजमुकुट चढला असला तरी अनेक आव्हाने त्यांच्यासमोर आहेत. तूर्त अशा आव्हानांना समर्थपणे सामोरे जात त्यांनी सीमाप्रश्नाच्या बाबतीत कठोर भूमिका घेऊन 'नवा महाराष्ट्र' घडविला तर महाराष्ट्राची मराठी जनता विसरणार नाही. यात तीळमात्र संदेह नाही, सीमाप्रश्न सुटावा यासाठी त्यांना आमच्या लक्ष लक्ष शुभेच्छा..!
✍️ डॉ.सुनिलकुमार सरनाईक
(लेखक भारत सरकारतर्फे स्वामी विवेकानंद राष्ट्रीय युवा पुरस्काराने व आचार्य बाळशास्त्री जांभेकर दर्पण पत्रकार पुरस्काराने सन्मानित आहेत.)