कृष्णा नदीवरील बंधाऱ्यावर मैत्रिणीसह सेल्फी काढताना पाय घसरल्याने युवक गेला वाहून
schedule07 Jul 24 person by visibility 431 categoryगुन्हे

सांगली : कृष्णा नदीवरील बंधाऱ्यावर मैत्रिणीसह सेल्फी काढताना पाय घसरून एक युवक पाण्यात वाहून गेला. सदरची घटना रविवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास घडली. मोईन गौसपाक मोमीन असे बेपत्ता झालेल्या युवकाचे नाव आहे. घटनेची माहिती मिळताच सांगली शहर पोलिस, जीवरक्षक टीम, महापालिकेच्या अग्निशमन दलाने धाव घेत शोधमोहीम सुरू केली. सायंकाळपर्यंत त्याचा नदीपात्रात शोध घेतला. पण त्याचा ठावठिकाणा लागू शकला नाही.
मोईन मोमीन हा बॉक्सर प्रशिक्षक आहे. तो आई-वडीलासह हनुमाननगरमध्ये राहतो. रविवारी सकाळी तो मैत्रिणीसह कृष्णा नदीकाठावर गेला होता. जिल्ह्यात संततधार पाऊस सुरू असल्याने कृष्णा नदी तुडूंब भरली आहे. नदीतील बंधाऱ्यावरून सांगलीवाडीच्या बाजूने तो मैत्रिणीसह चालत येत होता. मोबाईलवर सेल्फी घेताना मोईनचा तोल गेला. तो नदीपात्रात पडला. मोईन हा पोहणारा आहे. तरीही पाण्याचा वेग अधिक असल्याने तो पाण्यासोबत वाहून वाहून गेला.
पोलिसांचे पथकही कृष्णा नदीकाठी आले. आयुष्य हेल्पलाईन टीम, स्पेशल रेस्क्यु फोर्स, महापालिका अग्निशमन दलाच्या जवानांना बोलविण्यात आले. त्यांनी बोटीतून मोईनचा शोध घेतला. पण सायंकाळपर्यंत त्याचा ठावठिकाणा लागला नव्हता. अंधार झाल्याने शोधकार्य थांबविण्यात आले.