कागल तालुक्यात शिक्षकाने कौटुंबिक वादातून डोक्यात वरवंटा घालून पत्नीस संपवले
schedule01 Oct 24 person by visibility 575 categoryगुन्हे
मुरगूड : मुरगूड (ता. कागल) येथील साई कॉलनीत राहणाऱ्या परशराम पांडुरंग लोकरे (वय ५३) या शिक्षकाने कौटुंबिक वादातून सविता लोकरे (वय ४५) या शिक्षक पत्नीच्या डोक्यात वरवंटा घालून खून केला. आज मंगळवारी (दि. १) सकाळी साडेनऊच्या सुमारास ही घटना घडली या घटनेची मुरगूड पोलिसांत नोंद झाली आहे. पोलिसांनी शिक्षक पतीला अटक केली आहे.
साई कॉलनीत शिक्षक परशराम लोकरे व शिक्षिका सविता लोकरे हे एक मुलगा व दोन मुली अशा कुटुंबासह राहात होते. आज सकाळी चहापान सुरु असतानाच या दोघांत वाद सुरु झाला. यावेळी त्यांच्या मुलांनी वाद मिटविण्याचा प्रयत्न केला. पण शेवटी वाद टोकाला गेला. यावेळी सविता भांडी घासण्यासाठी गेल्या असता परशराम यांनी वरवंटा घेऊन धावत जाऊन सविताच्या डोक्यात घातला. त्यांच्या डोक्यात वर्मी घाव बसल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.
पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मुरगूड ग्रामीण रुग्णालयात पाठवला. दरम्यान, यासंबंधी अपूर्वा परशराम लोकरे हिने याबाबत मुरगूड पोलिसांत फिर्याद दिली आहे.