+91 74474 43501, +91 8888260551 | smpnewsnetworks@gmail.com |
Breaking News
adjustलोकसभा निवडणूक 2024 : गुरुवारी कोल्हापूरसाठी 12 उमेदवारांनी 16 तर हातकणंगलेसाठी 14 उमेदवारांनी 17 नामनिर्देशनपत्रे केली दाखल adjustयशवंत विद्यार्थी, मार्गदर्शक शिक्षक, मुख्याध्यापक यांचा सत्कार समारंभ उत्साहात adjustघरफाळा विभागाच्यावतीने 1 लाख 58 हजार 500 बिले जनरेट adjustभारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्तीचे अर्ज भरण्यास 30 एप्रिलपर्यंत मुदतवाढ adjustलोकसभा निवडणूक 2024 : माढ्यातील उमेदवाराची अर्ज भरण्यासाठी चक्क रेड्यावरुन एन्ट्री adjustघोडावत विद्यापीठातील कॉमर्स व मॅनॅजमेण्ट विभागाच्या ४५ विद्यार्थ्यांची विविध कंपन्यांमध्ये निवड adjustपरगावी असणाऱ्या कोल्हापूरकरांनी 7 मे रोजी मतदानासाठी येण्याचे जिल्हा निवडणूक अधिकारी, अमोल येडगे यांचे आवाहन adjustदुग्ध व्यवसायामुळेच शेतकऱ्यांची आर्थिक प्रगती : अरुण डोंगळे; कुशिरे येथे दूध उत्पादकांना जातिवंत म्हैशी प्रदान करण्याचा कार्यक्रम adjustआरटीई 25 टक्के अंतर्गत विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज करावेत adjustकोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूर, हातकणंगलेत परिसरात जोरदार पाऊस
Photo_1712720584815~2
Photo_1711784304922~2
SMP_news_Gokul_ghee
schedule21 Feb 24 person by visibility 279 categoryशैक्षणिक
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाला कल्चरल पॉवरहाऊस बनविण्याचे धोरण आपण अंगिकारले आहे. त्यादृष्टीने शिवस्पंदनसारखा महोत्सव अत्यंत उपयुक्त ठरेल, असे प्रतिपादन विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांनी आज येथे व्यक्त केले.

शिवाजी विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागाच्या वतीने आयोजित तीनदिवसीय शिवस्पंदन महोत्सव २०२३-२४ च्या उद्घाटन समारंभात अध्यक्षस्थानावरुन ते बोलत होते. वि.स खांडेकर भाषा भवन सभागृहात झालेल्या या कार्यक्रमास कुलसचिव डॉ. विलास शिंदे प्रमुख उपस्थित होते.

तत्पूर्वी, सकाळी ९ वाजता प्रांगणातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य अश्वारुढ पुतळ्यापासून वि.स. खांडेकर भाषा भवनापर्यंत ढोलताशांच्या गजरात मोठ्या जल्लोषाच्या वातावरणात शोभायात्रा काढण्यात आली. कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांच्या हस्ते शोभायात्रेचे उद्घाटन करण्यात आले.

प्र-कुलगुरू डॉ. पाटील म्हणाले, विकसित भारत या संकल्पनेमध्ये केवळ ज्ञानसंपन्नता अभिप्रेत नाही, तर कलासंपन्नताही तितकीच महत्त्वाची आहे. आपले राष्ट्रीय ऐक्य साधण्यासाठी संस्कृती जितकी महत्त्वाची ठरते, तितकीच आंतरराष्ट्रीय स्तरावर सहसंबंध निर्माण होण्यामध्ये ती कळीची भूमिका बजावते. त्यामुळे आपले विद्यार्थी आंतरराष्ट्रीय दर्जाचे घडविणे याचा अर्थच आपले आंतरराष्ट्रीय सांस्कृतिक दूत निर्माण करण्याची प्रक्रिया असते. त्यासाठी सर्व घटकांचे सहकार्य आवश्यक असते. कालच प्रधानमंत्री उच्च शिक्षण अभियानाअंतर्गत पुढील तीन वर्षांसाठी २० कोटी रुपयांचा निधी विद्यापीठास जाहीर करण्यात आला आहे. त्याअंतर्गत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी होलिस्टिक डेव्हलपमेंट सेंटर उभे करण्याचा विद्यापीठाचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनाकडून ‘आयुष्यात अशक्य असे काहीच नाही,’ असा धडा आपल्याला मिळतो. त्यानुसार आपली उद्दिष्ट्ये साध्य करण्यासाठी अत्यंत ध्येयनिष्ठेने विद्यार्थ्यांनी वाटचाल करावी, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी कुलसचिव डॉ. विलास शिंदे म्हणाले, कला ही जीवनावश्यक बाब आहे. मनावरील ताणतणाव दूर करण्यासाठी कलासाधना आवश्यक असते. आपल्या कलागुणांना वाव देण्याच्या दृष्टीने असे महोत्सव खूप मोलाचे ठरत असतात. विद्यार्थ्यांनी स्पर्धा म्हणून नव्हे, तर स्वानंदासाठी शिवस्पंदनमध्ये मनापासून सादरीकरण करावे, त्या सादरीकरणाशी सन्मयता साधून आपल्यातील कलागुणांचे योग्य प्रदर्शन करावे, असे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाच्या सुरवातीला मान्यवरांच्या हस्ते रोपास पाणी वाहून महोत्सवाचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले. महोत्सवाचे समन्वयक डॉ. नितीन कांबळे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. डॉ. मीना पोतदार यांनी सूत्रसंचालन केले, तर विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. प्रकाश गायकवाड यांनी आभार मानले. यावेळी महोत्सवात सहभागी झालेल्या ४०० विद्यार्थी-विद्यार्थिनींसह संयोजन समितीचे सदस्य उपस्थित होते.

🔶️ आनंद, उत्साहाबरोबरच शिस्तपालनही महत्त्वाचे: कुलगुरू डॉ. शिर्के
आज सकाळी ९ वाजता विद्यापीठ प्रांगणातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य पुतळ्यापासून शिवस्पंदन महोत्सवाच्या उद्घाटनानिमित्त वि.स. खांडेकर भाषा भवनपर्यंत शोभायात्रा काढण्यात आली. कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांच्या हस्ते शोभायात्रेचे उद्घाटन करण्यात आले.

यावेळी कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले, गतवर्षीपासून विद्यापीठातील विद्यार्थ्यांसाठी ‘शिवस्पंदन’ महोत्सव सुरू करण्यात आला. त्याला अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यंदाही महोत्सव चांगल्या तऱ्हेने पार पडण्यासाठी पुढील तीन दिवस विद्यार्थ्यांनी आनंद, उत्साह आणि जल्लोष करीत असताना विद्यार्थ्यांनी शिस्तीचे पालनही कसोशीने करावे. शिवाजी विद्यापीठाच्या लौकिकास आपल्या वर्तनाने कोठेही बाधा येणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.

शोभायात्रेमध्ये प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, कुलसचिव डॉ. विलास शिंदे, डॉ. प्रकाश गायकवाड, डॉ. सागर डेळेकर, डॉ. रामचंद्र पवार, डॉ. नितीन कांबळे, डॉ. मीना पोतदार, डॉ. के.एम. गरडकर, डॉ. आसावरी जाधव, डॉ. प्रल्हाद माने, डॉ. पांडुरंग पाटील, डॉ. प्रतिभा देसाई, डॉ. एस.टी. कोंबडे, डॉ. व्ही.एस. खंडागळे, डॉ. प्रमोद कसबे यांच्यासह संयोजन समितीचे सदस्य आणि विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

🔶️ महोत्सवात आज: मूकनाट्य, नकला व लघुनाटिका
शिवस्पंदन महोत्सवाच्या उद्घाटन सत्रानंतर आज दिवसभरात सुगम गायन, एकल लोकवाद्य वादन आणि समूहगीत स्पर्धा झाल्या. या महोत्सवात उद्या, गुरूवारी (दि. २२) मूकनाट्य, नकला आणि लघुनाटिका सादर होतील. हे सर्व कार्यक्रम वि.स. खांडेकर भाषा भवन सभागृहात सकाळी १० वाजल्यापासून सादर होणार आहेत.