जयसिंगपूर : २ कोटींच्या निधीतून क्रांती चौक ते रेल्वे स्टेशन रस्त्याच्या डांबरीकरणाचा शुभारंभ
schedule24 Nov 26 person by visibility 162 categoryराज्य
जयसिंगपूर : जयसिंगपूर शहरातील पायाभूत सुविधांना बळकटी देण्याच्या दृष्टीने क्रांती चौक ते रेल्वे स्टेशन या महत्त्वपूर्ण रस्त्याच्या डांबरीकरण कामाचा शुभारंभ करण्यात आला. आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या निधीतून या रस्त्याच्या कामासाठी २ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला असून, या कामामुळे शहरातील नागरिकांना दर्जेदार रस्ते उपलब्ध होणार आहेत.
जयसिंगपूर शहरातील रस्ते अधिक दर्जेदार आणि वाहतुकीसाठी सुकर व्हावेत, या उद्देशाने विविध रस्त्यांच्या कामांना प्राधान्य देण्यात येत आहे. भुयारी गटार योजनेची कामे पूर्ण झाल्यानंतर शहरातील रस्त्यांचे डांबरीकरण आणि मजबुतीकरण करण्यावर भर दिला जात आहे. याचाच एक भाग म्हणून क्रांती चौक ते रेल्वे स्टेशन या मार्गाच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे.
यावेळी बोलताना नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर म्हणाले की, जयसिंगपूर शहराचा सर्वांगीण विकास साधताना शहरातील रस्त्यांच्या कामांना प्राधान्य देण्यात येत आहे. भुयारी गटार योजनेनंतर शहरातील रस्ते दर्जेदार व्हावेत, यासाठी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला जात आहे. शहरातील नागरिकांना उत्तम दर्जाचे रस्ते मिळावेत आणि वाहतूक व्यवस्था अधिक सुलभ व्हावी, यासाठी नियोजनबद्ध पद्धतीने कामे हाती घेण्यात येत आहेत.
जयसिंगपूर शहराची विकासाच्या दिशेने वाटचाल सुरू असून, शहरातील मूलभूत सुविधांचा दर्जा उंचावण्याचा प्रयत्न केला जात आहे. आगामी काळातही शहराच्या विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, अशी ग्वाही नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर यांनी दिली.
क्रांती चौक ते रेल्वे स्टेशन हा शहरातील महत्त्वाचा मार्ग असल्याने या रस्त्याचे डांबरीकरण पूर्ण झाल्यानंतर नागरिकांसह वाहनधारकांना मोठा दिलासा मिळणार आहे. शहराच्या विकासकामांमध्ये रस्ते सुधारणा हा महत्त्वाचा टप्पा ठरत आहे.
या प्रसंगी उपनगराध्यक्ष अनुराधा आडके, बांधकाम सभापती सचिन उर्फ बंडू निटवे, नगरसेविका मीनल नांद्रेकर, माजी नगरसेवक राहुल बंडगर, विजय माणगावे, शांतीनाथ उपाध्ये, प्रवीण इंगळे, नगरपरिषद अधिकारी जावेद मुल्ला, बाफना सर, ललित इंगळे,सुनित्रा उपाध्ये,वर्षा उपाध्ये, ज्योती पाटील यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.