+91 74474 43501, +91 8888260551 | smpnewsnetworks@gmail.com |
Breaking News
adjustकोल्हापूर जिल्ह्यातील संभाव्य पूर परिस्थितीचा विचार करुन सतर्क रहा : जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या प्रशासकीय यंत्रणेला सूचना adjustकोल्हापूर जिल्ह्यातील 75 बंधारे पाण्याखाली; वाहतुकीस पर्यायी मार्गाचा अवलंब; राधानगरी धरणातून 1450 क्युसेक विसर्ग adjustकोणत्याही संस्थेचा चतुर्थश्रेणी कर्मचारी हा ब्रँन्ड अॅम्बॅसॅडर : मेधा जेरे adjustडीकेटीईच्या सहा विद्यार्थ्यांची नामांकित ‘भारत फोर्ज ‘ कंपनीमध्ये निवड adjustशिवकालीन महाराष्ट्र हे भारताच्या इतिहासातील सोनेरी पान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे adjustसंजय गांधी निराधार, श्रावणबाळ योजना डीबीटीसाठी बँक खाते व आधार लिंक करा : उपजिल्हाधिकारी डॉ. संपत खिलारी adjustगजापूर मधील भयभीत जीवनमान पूर्वपदावर आणणे आपले सर्वांचे व प्रशासनाचे प्राधान्य : पालकमंत्री हसन मुश्रीफ adjustविशाळगड प्रकरणः कोल्हापुरात एमआयएमची पावसात निदर्शने; हल्लेखोरांवर कडक कारवाई करण्याची मागणी adjustविशाळगड येथील घटनेचा मंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडून आढावा adjustडी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाला ऊर्जा साठवणूक पद्धतीसाठी पेटंट
1000867055
1000866789
schedule09 Jul 24 person by visibility 290 categoryशैक्षणिक
कोल्हापूर : अतिसूक्ष्म अशा नॅनो-संमिश्रांपासून सौरऊर्जा निर्माण करणाऱ्या अभिनव स्वरुपाच्या बाईंडरविरहित उपकरण तयार करण्याच्या पद्धतीला यू.के. सरकारचे पेटंट प्राप्त झाले आहे. शिवाजी विद्यापीठाच्या रसायनशास्त्र अधिविभागातील डॉ. क्रांतीवीर मोरे आणि डॉ. सागर डेळेकर यांनी ही पद्धती विकसित केली आहे.

या संशोधनाबद्दल अधिक माहिती देताना डॉ. मोरे म्हणाले, सौरऊर्जेचे उत्पादन हे त्या उपकरणामध्ये वापरल्या जाणाऱ्या अनेक घटकांवर अवलंबून असते. ते उपकरण बनवण्यासाठी वापरली जाणारी पद्धतीही तितकीच महत्त्वाची असते. त्या दृष्टीने वेगवेगळ्या अतिसूक्ष्म नॅनो संमिश्रापासून सौरऊर्जा निर्माण करणारे नाविन्यपूर्ण उपकरण कमीत कमी वेळेमध्ये आणि अल्पखर्चामध्ये तयार करण्यात यश आले आहे. कॅडमियम सल्फाइड क्वांटम डॉट, नैसर्गिक रंग, टायटॅनियम डायऑक्साईड या नॅनो मूलद्रव्यांचा वापर हे उपकरण बनवण्यासाठी करण्यात आला. या उपकरण निर्मितीच्या नव्या पद्धतीमुळे सौर ऊर्जाक्षेत्रातील संशोधनाला नवी दिशा मिळेल.

 सदर उपकरण हे कमीत कमी तापमानामध्ये अत्यल्प वेळेत बनवता येते. तसेच ते सुलभ रितीने हाताळता येते. सौरऊर्जा निर्माण करण्याकरिता हे उपकरण आणि ते तयार करण्याची पद्धत सौर ऊर्जा क्षेत्रात काम करणाऱ्या संशोधकांसाठी उपयुक्त ठरेल, अशी खात्री डॉ. मोरे यांनी व्यक्त केली. डॉ. मोरे यांचे संशोधन क्षेत्रातील हे चौथे पेटंट आहे.

या संदर्भात बोलताना डॉ. सागर डेळेकर म्हणाले, ऊर्जेचे संकट ही जागतिक स्तरावर भेडसावणारी प्रमुख समस्या आहे. ऊर्जेचे विविध पर्याय शोधणे हा त्यावरील महत्त्वाचा उपाय आहे. त्यासाठी सौरऊर्जा हा अतिशय उत्तम पर्याय आहे. शेतीसोबतच दैनंदिन जीवनात सौरउपकरणांचा अधिकाधिक वापर केला, तर बरीचशी कामे कमी खर्चात होऊ शकतात. जगावरील ऊर्जेचा ताणही कमी होऊ शकतो. बदलत्या काळानुरूप आपण सौर ऊर्जेचा वापर वाढविला पाहिजे. सद्यस्थितीत सौरऊर्जा उत्पादनाचा खर्च हा सर्वसामान्यांना परवडणारा नाही. म्हणूनच कमीत कमी खर्चामध्ये सौरऊर्जा निर्माण करणाऱ्या नाविन्यपूर्ण उपकरण निर्मितीचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेऊन संशोधन केले. त्यातून अतिसूक्ष्म नॅनो संमिश्रांपासून सौरऊर्जा निर्माण करणारी नाविन्यपूर्ण बाईंडरविरहित उपकरणाची पद्धती विकसित केली. 

या पद्धतीला भारत सरकारबरोबरच आता यू. के. सरकारचेही पेटंट मिळाले आहे, ही आनंदाची बाब आहे.

या संशोधनासाठी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, कुलसचिव डॉ. विलास शिंदे, अधिविभागप्रमुख डॉ. कैलास सोनवणे यांचे मार्गदर्शन लाभले, असेही त्यांनी सांगितले.

🟠विद्यापीठाच्या संशोधकांची अभिमानास्पद कामगिरी: कुलगुरू डॉ. शिर्के
ऊर्जेची समस्या ही आज जागतिक स्तरावर भेडसावत आहे. त्यावर विविध उपाययोजना करण्यासाठी जगभरातील संशोधकांनी प्रयत्न चालविले आहेत. यामध्ये सुरवातीपासूनच शिवाजी विद्यापीठाच्या संशोधकांनी आघाडी घेतलेली आहे. त्यामध्ये आता या नॅनो संमिश्रापासून बाईंडरविरहित सौरऊर्जा उपकरण निर्माण करण्याची नवी पद्धती शोधून डॉ. क्रांतीवीर मोरे आणि त्यांचे मार्गदर्शक डॉ. सागर डेळेकर यांनी मोलाची भर घातलेली आहे. या संशोधनास यू.के. पेटंट जाहीर झाल्याने संशोधनाच्या दर्जावरही जागतिक मोहोर उमटली आहे. संशोधकांची ही कामगिरी अभिमानास्पद असून उदयोन्मुख संशोधकांसाठी आदर्शवत स्वरुपाची आहे, अशी प्रतिक्रिया कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांनी व्यक्त केली.