विभागीय क्रीडा संकुलाच्या १९५ कोटींच्या सुधारित आराखड्यास विभागीय समितीची मंजुरी
schedule11 Feb 26 person by visibility 103 categoryराज्य
▪️कोल्हापूरच्या क्रीडा परंपरेला साजेसे अद्ययावत संकुल बनवा : पालकमंत्री प्रकाश आबिटकर
कोल्हापूर : छत्रपती संभाजी महाराज विभागीय क्रीडा संकुलाचा १९५ कोटी रुपयांचा सुधारित आराखडा विभागीय समितीसमोर सादर करण्यात आला असून, पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या अध्यक्षतेखालील समितीने या आराखड्याला मंजुरी दिली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहूजी सभागृहात आयोजित विभागीय क्रीडा संकुलाच्या आढावा बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यावेळी बोलताना पालकमंत्री प्रकाश आबिटकर म्हणाले की, कोल्हापूर ही खऱ्या अर्थाने क्रीडानगरी आहे. त्यामुळे या जिल्ह्याच्या क्रीडा परंपरेला साजेसे आणि खेळाडूंच्या सर्वांगीण क्षमतेला वाव मिळेल, असे अद्ययावत क्रीडा संकुल उभारण्यात यावे.
या संकुलासाठी खरेदी करण्यात येणारे क्रीडा साहित्य दर्जेदार आणि उच्च गुणवत्तेचे असावे, त्याबाबत कोणतीही तडजोड केली जाऊ नये, असे निर्देशही पालकमंत्र्यांनी दिले.
बैठकीदरम्यान आमदार अमल महाडिक यांनी क्रीडा धोरणाबाबत दीर्घकालीन पॉलिसी बनवण्याची आणि संकुलाच्या स्वच्छता व सुरक्षिततेसाठी बाह्य स्रोतांची मदत घेण्याची सूचना केली. या सुधारित आराखड्यानुसार, विभागात चार खेळांची 'एक्सलन्स सेंटर' सुरू करण्यात येणार आहेत. यामध्ये कोल्हापुरात कुस्ती व शूटिंग, साताऱ्यात धनुर्विद्या, तर सांगली येथे रोइंग केंद्र सुरू केले जाईल.
'मिशन लक्षवेध' योजनेअंतर्गत बारा क्रीडा प्रकारांची निवड करण्यात आल्याची माहिती विभागीय क्रीडा संकुल समितीचे सचिव सुहास पाटील यांनी सादरीकरणाद्वारे दिली.
या विभागीय क्रीडा संकुल समितीच्या 195 कोटीच्या आराखड्यामध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे सिंथेटिक ॲथलेटिक्स ट्रॅक ,2000 आसन क्षमतेची गॅलरी, फीफा स्टॅंडर्ड फुटबॉल मैदान, स्पोर्ट्स हॉस्टेल, मल्टीपर्पज इनडोअर हॉल , विविध खेळांच्या प्रशिक्षणासाठी मल्टीपर्पज बिल्डिंग, लॉन टेनिस सिंथेटिक कोर्ट, बास्केटबॉल कोर्ट विविध खेळांची मैदाने, नागरिकांसाठी वॉकिंग ट्रॅक, भंडारगृह, स्पोर्ट्स सायन्स लॅब आदी सुविधांचा समावेश आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाने या आराखड्याला दोन दिवसांत तांत्रिक मान्यता देण्याचे आश्वासित केले आहे. या बैठकीला जिल्हाधिकारी अमोल येडगे, माहिती उपसंचालक प्रवीण टाके, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता तुषार बुरुड, जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस, कार्यकारी अभियंता रोहित तोंदले, मनपाचे कार्यकारी अभियंता हर्षजीत घाटगे यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.