वाचन संस्कृती वृद्धिंगत करीत राहणे आवश्यक : जयवंत आवटे
schedule10 Aug 26 person by visibility 87 categoryशैक्षणिक
कोल्हापूर : वाचन संस्कृतीला वृद्धिंगत करीत राहणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन साहित्यिक जयवंत आवटे यांनी केले. शिवाजी विद्यापीठाच्या मराठी अधिविभागात विद्यार्थी स्वागत समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अधिविभागप्रमुख डॉ. रणधीर शिंदे अध्यक्षस्थानी होते.
यावेळी आवटे म्हणाले, आज आपण आधुनिकीकरणाच्या काळात वावरत असलो तरी, साहित्य हेच आपला विवेक जागृत ठेवण्याचे काम करील. त्यासाठी सातत्याने वाचन करून जीवन समृद्ध करता येते. वर्गात उपस्थित राहून शिकणे ही चेतना जागृत असल्याचे लक्षण आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी ग्रंथांकडे वळून आपली उन्नती साधावी. यावेळी त्यांनी जीवनातील दाखले दिले. ‘जाणती’ या कथेचे कथाकथन करून उपस्थितांना मनमुराद हसवले.
अध्यक्षीय मनोगतात डॉ. रणधीर शिंदे म्हणाले, ग्रंथ आयुष्याला कलाटणी देतात. त्यामुळे विचारांना स्पष्टता येते. त्यासाठी विद्यार्थ्यांनी चौफेर दृष्टी ठेवून ज्ञानार्जक होणे आवश्यक आहे.
यावेळी प्रा. नंदकुमार मोरे यांनी शुभेच्छा दिल्या. एम. ए. भाग-१मधील सुधीर पोटे, स्नेहल माने, निरंजन घुले या विद्यार्थ्यांनी मनोगते व्यक्त केली. अनिता मिस्कुळ यांनी सूत्रसंचालन केले. मृण्मयी पांचाल यांनी आभार मानले. यावेळी प्रा. चंद्रकांत पोतदार, डॉ. सुखदेव एकल, रवि लोंढे, विद्यार्थी-विद्यार्थिनी, संशोधक विद्यार्थी उपस्थित होते.