पाच लाखांच्या दागिन्यावर मोलकरणीनेच मारला डल्ला; कोल्हापुरातील नागाळापार्क येथील चोरीचा छडा
schedule22 Sep 24 person by visibility 260 categoryगुन्हे
कोल्हापूर : नागाळा पार्क येथील खानविलकर पेट्रोल पंपाजवळ राहणारे आशिष देशमुख यांच्या घरातून अकरा तोळे सोन्याचे दागिने अज्ञाताने लंपास केले होते. हा प्रकार ५ जानेवारी ते ९ सप्टेंबर दरम्यान घडला. याप्रकरणी घरकाम करणाऱ्या सिध्दव्वा लिंगाप्पा गर्गद (वय ४०, सध्या रा. नागाळा पार्क) हिला अटक करण्यात आली. तिच्याकडून चोरीचे ४ लाख ९५ हजार ९५० रुपये किमंतीचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले.
नागाळा पार्क येथील हरीपुजापुरम येथे राहणाऱ्या अशिष अंबादास देशमुख हे कुंटुबासह राहतात. त्याच्या घरात अकरा तोळे वजनाचे ६ लाख ५९ हजार ७५० रुपये किंमतीच्या दागिन्यांची चोरी झाल्याची फिर्याद शाहुपूरी पोलिसात दाखल झाली होती.
ही चोरी देशमुख यांच्या घरी आठ वर्षांपासून काम करणाऱ्या महिलेने केल्याची माहिती उपनिरीक्षक जालिंदर जाधव व अमंलदार अमित सर्जे यांना मिळाली. त्यानुसार सिध्दव्वा गर्गद (मूळ गाव बेडसुळ,ता. सौंदत्ती, जि. बेळगाव, कर्नाटक सध्या रा. नागाळा पार्क) हिला ताब्यात घेण्यात आले. सुरूवातीला तिने उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र उपनिरीक्षक जालिंदर जाधव यांनी पंचाच्या समक्ष तिच्या घराची झडती घेतली.
यावेळी चोरीस गेलेल्या दागिन्यांपैकी ७६.०३ ग्रॅम वजनाचे ४ लाख ९५ हजार ९५० रुपये किमंतीचे दागिने मिळून आले. त्यानंतर तिने आशिष देशमुख यांच्या घरातीलच दागिने चोरले असल्याची कबुली दिली.