दामिनी हॉटेल ते व्हीनस कॉर्नर, राजारामपुरी बस रूटवरील पॅचवर्क आणि परिख पूल क्रॉक्रीट रस्ता कामाची प्रशासक के. मंजूलक्ष्मी यांच्याकडून पाहणी
schedule01 Dec 25 person by visibility 60 categoryमहानगरपालिका
कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेकडून भाडेतत्त्वावर घेतलेला डांबरी प्लांट हलसवडे येथे सुरू करण्यात आला असून, या प्लांटमधून मिळालेल्या प्रिमिक्स डांबराचा वापर शहरातील पॅचवर्कसाठी सुरू झाला आहे. या प्रिमिक्सद्वारे दामिनी हॉटेल ते दाभोळकर कॉर्नर दरम्यानच्या रस्त्याच्या डांबरी पॅचवर्कची कामे सुरू असून, आज सकाळी प्रशासक के. मंजूलक्ष्मी यांनी प्रत्यक्ष पॅचर्कच्या कामाच्या स्थळी भेट देऊन पहाणी केली.
शहरातील रस्ते पॅचवर्क कामे गतीने होण्यासाठी महापालिकेने भाडेतत्वावर प्लॅन्ट भाडयाने घेतला असून या प्लॅन्टवर महापालिकेच्या वार्षीक ठेकेदाराकडून खडी घेण्यात येत आहे. तसेच प्लॅन्टसाठी लागणारे डांबर महापालिका स्वत: डायरेक्ट एच.पी.सी.एल. कंपनीकडून खरेदी करत असून महापालिकेची सर्व यंत्रणा व कर्मचा-यांमार्फत या रस्ते पॅचवर्कची कामे सुरु करण्यात आली आहेत. त्यामुळे रस्ते पॅचवर्क कामे दर्जेदार व उत्तम प्रतीची होणार आहेत.
तसेच एनकॅपमधून परिख पुलासाठी अडीच कोटी निधी मंजुर असून या रस्त्याचे काम प्रत्यक्ष सुरु आहे. या मध्यवर्ती बस स्थानकाजवळील आर.एल. ज्वेलर्स ते परिख पूल ते रेल्वे फाटक या मार्गावरील सुरू असलेल्या कॉंक्रिट रस्त्याच्या कामाचीही त्यांनी पाहणी केली.
या वेळी प्रशासकांनी पाणी पुरवठा, ड्रेनेज तसेच विद्युत विभागाने क्रॉसिंगदरम्यान दैनंदिन समन्वय ठेवण्याच्या सूचना दिल्या. परिख पूल परिसरातील युटिलिटी कामादरम्यान कोणतेही लिकेज असल्यास ते तातडीने दूर करण्याचे निर्देश जल अभियंता, शाखा अभियंता व ड्रेनेज विभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आले. तसेच परिख पुल येथील सदरचे एका बाजूचे काम तातडीने पुर्ण करुन उर्वरीत दुस-या बाजूचे काम सुरु करण्याबाबत संबधीत ठेकेदारास निर्देश दिले.
त्याचबरोबर राजारामपुरी बस रूटवरील निकृष्ट दर्जाच्या पॅचवर्कबाबत नागरिकांच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर प्रशासकांनी प्रत्यक्ष या रूटची पाहणी केली. सदर ठेकेदाराने निकृष्ट दर्जाचे काम केल्याचे निदर्शनास येताच त्या ठेकेदाराला नोटीस देण्याचे तसेच दर्जेदार कामे करून घेण्याच्या सूचना उप-शहर अभियंत्यांना देण्यात आल्या. तसेच उपशहर अभियंता व संबंधीत कनिष्ठ अभियंता यांनाही कारणे दाखवा नोटीसा देण्याचे निर्देश शहर अभियंता यांना देऊन संबंधित ठेकेदाराची देयके थांबविण्याचे निर्देशही देण्यात आले.
यावेळी सहा.आयुक्त कृष्णा पाटील, शहर अभियंता रमेश मस्कर, उप-शहर अभियंता निवास पवार, अरुण गुजर, कनिष्ठ अभियंता उमेश बागुल, मिरा नगीमे, सर्व्हेअर अर्जुन कावळे उपस्थित होते.