कोल्हापूर : सुनावणीनंतर न्यायालय परिसरातच प्रशांत कोरटकरवर हल्ल्याचा प्रयत्न
schedule28 Mar 25 person by visibility 358 categoryगुन्हे

कोल्हापूर: कोल्हापूर सत्र न्यायालयात सुनावणीसाठी आणण्यात आलेल्या प्रशांत कोरटकरवर वकिलाने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. पोलिस बंदोबस्त असताना कोरटकरवर हल्ल्याचा प्रयत्न झाल्याने न्यायालय परिसरात खळबळ उडाली. पोलिसांनी वेळीच हल्ला करणाऱ्या वकिलाला आवरल्याने मोठा अनर्थ टळला. दरम्यान, आज शुक्रवारी झालेल्या सुनावणीत न्यायालयाने कोरटकरच्या पोलिस कोठडीत दोन दिवसाची (३० मार्चपर्यंत) वाढ केली.
आज, शुक्रवारी चौथे सह दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ सत्र एस. एस. तट यांच्यासमोर ही सुनावणी झाली. कोरटकर याचा अधिक तपास होण्यासाठी पोलीस कोठडीत वाढ मिळावी, अशी मागणी अॅड. असीम सरोदे आणि सरकारी वकील सूर्यकांत पोवार यांनी केली होती.
दरम्यान सुरक्षेच्या कारणासाठी कोरटकरला सकाळी आठ वाजता राजारामपुरी पोलिस कोठडीतून बाहेर काढले. त्या वेळी आंदोलनाचा प्रयत्न करणाऱ्या जयदीप शेळके याला पोलिसांनी ताब्यात घेतले. दुपारी बारा नंतर न्यायालयात सुनावणी झाली. कोरटकरच्या पोलिस कोठडीत दोन दिवसांची वाढ केली. आरोपीचे वकील सौरभ घाग यांनी कोरटकर यांची बाजू मांडली.
सुनावणीनंतर त्याला कोठडीकडे नेताना पोलिसांच्या गराड्यातच रूकडी येथील वकील अमितकुमार भोसले याने त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांच्या उपस्थितीत त्याने हा प्रयत्न केल्याने पोलिस यंत्रणा पूर्णपणे हडबडून गेली. या घटनेने वातावरण तणावपूर्ण बनले होते.