कोल्हापूर : उमा टॉकीज चौक येथील आनंद ऑटो गॅरेजमधुन अवैध गॅस रिफिलिंग स्टेशनवर धाड; साठ हजार किंमतीचा मुद्देमाल जप्त
schedule25 Feb 25 person by visibility 339 categoryगुन्हे

कोल्हापूर : कोल्हापूर शहरातील उमा टॉकीज चौक परिसरातील सिद्धिविनायक गणपती मंदिरातला लागून असलेल्या महादेव शिंदे यांच्या आनंद ऑटो गॅरेज या अवैध गॅस रिफिलिंग स्टेशनवर कोल्हापूर शहर अन्नधान्य वितरण अधिकारी कार्यालयाच्या पथकाने आज अचानक धाड टाकून परवाना नसल्याने एकूण सोळा गॅस सिलेंडर, एक इलेक्ट्रॉनिक वजन काटा, एक एचपी क्षमतेची मोटर असा एकूण अंदाजे साठ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला.
यापूर्वीही शहर पुरवठा कार्यालयाच्या पथकाने 2024 मध्ये याच ठिकाणी कारवाई करुन महादेव शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. या गॅस रिफिलिंग स्टेशनच्या अगदी बाजूला ऐतिहासिक सिद्धिविनायक मंदिर आहे, त्यामुळे हे ठिकाण गर्दीचे असून काही अपघात घडला तर सामाजिक सलोख्याच्या दृष्टीने संवेदनशील ठरु शकते. त्यामुळे गेल्या वर्षी कारवाई करताना संबंधितांना याबाबतीत समज देण्यात आली होती व राजवाडा पोलीस स्टेशनमध्ये संबंधितावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. यावेळीही जुना राजवाडा पोलीस स्टेशनमध्ये संबंधितावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण यांच्या निर्देशानुसार अन्नधान्य वितरण अधिकारी नितीन धापसे पाटील यांच्या नेतृत्वाखाली पुरवठा निरीक्षक महेश काटकर व पुरवठा निरीक्षक भाऊसाहेब खोत यांच्या पथकाने ही कारवाई केली. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी या कारवाईबद्दल पुरवठा विभागाचे अभिनंदन केले व शहरातील अशा अवैध गॅस रिफिलिंग स्टेशनवर यापुढेही कारवाई करत राहण्याच्या सूचना दिल्या.