मित्राच्या खून प्रकरणी आरोपीला जन्मठेपेची शिक्षा; कोल्हापूर जिल्हा न्यायालयाचा निकाल
schedule18 Apr 26 person by visibility 143 categoryगुन्हे
कोल्हापूर : पूर्वीच्या वैमनस्यातून आणि पैशांच्या व्यवहारातील वादातून मित्राचा चाकूने वार करून खून केल्याप्रकरणी आरोपी संदीप बापू माने (वय ४०, रा. जुनी सोनतळी) याला कोल्हापूरच्या प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती कविता बी. अग्रवाल यांनी आजन्म कारावास आणि ५,००० रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. न्यायालयाने दंडाची ही रक्कम मृताच्या कुटुंबीयांना नुकसान भरपाई म्हणून देण्याचे आदेशही दिले आहेत. २४ जून २०२२ रोजी रात्री १० च्या सुमारास जुनी सोनतळी येथे ही घटना घडली होती, ज्यात भरत शंकर नाईक (वय २३) या तरुणाचा निर्घृण खून झाला होता.
घटनेच्या दिवशी आरोपी संदीप माने आणि भरत नाईक यांच्यात पैशांच्या कारणावरून शाब्दिक चकमक झाली होती. त्यानंतर भरत आपल्या मित्रासह पुन्हा आरोपीच्या घराकडे गेला असता, आरोपीने 'तुला आता संपवतोच' असे म्हणत चाकूने भरतच्या पोटावर आणि मानेवर सपासप वार केले. गंभीर जखमी झालेल्या भरतचा दुसऱ्या दिवशी २५ जून रोजी उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी अजित भिकाजी आरडे यांनी करवीर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.
या खटल्यात सरकारी वकील मंजुषा बी. पाटील यांनी एकूण ११ साक्षीदार तपासले. यामध्ये प्रत्यक्षदर्शी साक्षीदार अजित आरडे, संदीप साठे आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांची साक्ष पुराव्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची ठरली. तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक सूरज बनसोडे यांनी या गुन्ह्याचा तपास केला होता. सरकारी पक्षाने मांडलेला युक्तिवाद आणि सादर केलेले पुरावे ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपीला भा.दं.वि. कलम ३०२ अन्वये दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली. या न्यायालयीन प्रक्रियेत पैरवी अंमलदार सागर पोवार यांनी सहकार्य केले.